मुंबई : पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक बुधवारी सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांना ९ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार असून १० ऑगस्ट रोजी राज्य कोट्यासाठीची सर्वसामान्य यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्या यादीत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची १४ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर करण्यात येईल.
पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीपूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमधून दोन निवड यादी जाहीर झाल्यानंतर तिसऱ्या फेरीसाठीचे वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार तिसऱ्या फेरीसाठी नव्याने नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ६ ते ९ ऑगस्टदरम्यान नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसामान्य यादी व अंतरिम यादी १० ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तिसऱ्या फेरीसाठीचा रिक्त जागांचा तपशील ११ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ११ व १२ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरता येणार आहे.
तिसऱ्या यादीची निवड यादी १४ ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून या विद्यार्थ्यांना १६ ते २० ऑगस्टदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर मुक्त फेरीसाठी २० ऑगस्ट रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम २१ व २२ ऑगस्ट रोजी भरता येणार आहे. या फेरीसाठी निवड यादी २३ ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून, २४ ते २६ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.