शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे. वरळीतून माझी अनामत रक्क जप्त होईल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याविरोधात ठाण्यातून लढायला तयार आहे. तुमच्या कोपरी-पाचपाखाडी परिसरात येऊन निवडणूक लढवेन. अन्यथा तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
वरळीच्या जांबोरी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या निर्धार सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानाचा अपमान गद्दार सरकार करत आहे. वरळी-शिवडी प्रकल्प, कोस्टल रोड, उद्याने, उड्डाणपूल, मैदानांची काम आमचं सरकार करत होतं. या कामांना स्थगिती देऊन पुन्हा एकदा कंत्राट काढली जात आहेत. कारण, यांचे ठेकेदार तिथे बसले पाहिजेत. हे सरकार ईडी सरकार नसून बिसी ( बिल्डर आणि कॉन्ट्रक्टर ) सरकार बनलं आहे,” असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.
“गद्दारांचं सरकार कोसळणार म्हणजे…”
“करोना काळात मुंबईत झालेल्या कामांची दखल देशाने घेतली. देशभरातून अधिकारी यायचे आणि कामाची माहिती घ्यायचे. दिवस-रात्र आपण काम केलं. मुंबईने देशाला मार्ग दाखवण्याचं काम केलं आहे. पण, मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीच हे सरकार कोसळणार. गद्दारांचं सरकार अल्पायुषी आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणारचं. गद्दारांचा गेम ओव्हर झाला आहे,” असं हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला आहे.