पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी, आज भाजपा आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र, ही यात्रा निघण्या अगोदरच राम कदम यांना पोलिसांनी त्यांच्या निवास्थानावरून ताब्यात घेतलं होतं. यानंतर भाजपा नेते नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी राम कदम यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाणे गाठलं. दरम्यान, पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर राम कदम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ” हा संघर्ष थांबणार नाही, येणाऱ्या काळात लोकं महाराष्ट्र सरकारचा विरोध करत रस्त्यांवर उतरतील” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी राम कदम म्हणाले की, ” मी स्पष्टपणे एक गोष्ट इथं सांगू इच्छितो की, पालघरमध्ये ज्याप्रकारे साधुंची हत्या झाली. त्या वयोवृद्ध साधुंचा आक्रोश आज देखील हा देश विसरलेला नाही. प्रत्येक आखाड्यात सर्व साधु-महंत आज देखील त्यामुळे संतप्त आहेत. दरम्यान, करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर असल्याने कुणी रस्त्यावर उतरलं नव्हतं. पण आज आम्ही सुरूवात केली आहे. येणाऱ्या काळात लोकं महाराष्ट्र सरकारचा विरोध करत रस्त्यांवर उतरतील. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जावं अशी मागणी केली जाईल.”

आणखी वाचा- शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही; उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत – राणे

तसेच, ”आज आमच्या जनआक्रोश यात्रेला, महाराष्ट्र सरकारने जबरदस्ती थांबवण्याचं धाडस केलं आहे. याची आम्ही निंदा करतो, ही लाजीरवाणी बाब आहे. दुर्देवाने महाराष्ट्राची ही पवित्र भूमी चुकीच्या हाती आहे. आज आमचे नेते नारायण राणे, आमदार नितेश राणे व आम्ही या ठिकाणी आलो व आम्ही पोलिसांना विनंती केली की, आम्हाला जनआक्रोश यात्रेला परवानगी द्यावी. आम्हाला त्या भूमीवर जाऊ द्या, ज्या ठिकाणी आमच्या साधुंना मारले गेले, मारून मारून त्यांची हत्या केली गेली. आम्ही पोलिसांना विनंती केली की, आम्हाला तिथं जाऊन दिवे पेटावायचे आहेत. आता तिथं दिवे पेटवणं हा गुन्हा असू शकतो का? कोणता अपराध आहे? मात्र आम्हाला दिवे पेटवण्यासही त्यांनी रोखलं. आम्ही म्हटलं आम्हाला तिथं जाऊन उपोषण करायचे आहे. सरकारकडे मागणी करायची आहे, न्यायासाठी दाद मागायची आहे. २१२ दिवस झाले, मात्र २१२ दिवसानंतरही महाराष्ट्राचे हे बिनकामी सरकार जे कुंभकर्णाच्या झोपेत आहे. जे दुर्योधनाच्या अहंकारात आहे, ते ऐकण्यास तयार नाही.” असं देखील राम कदम म्हणाले.

”आम्ही पोलिसांचा सन्मान करतो. आमचे नेते नारायण राणे यांनी देखील पोलिसांना विनंती केली. परंतु पोलीस महाराष्ट्र सरकारच्या दबावात आहे. आमची जनआक्रोश यात्रा रोखत आहे. आम्हाला पालघरला जाण्यापासून अडवत आहे. या प्रकारची दडपशाही आम्ही सहन करणार नाही. आज संघर्षाची सुरूवात झाली आहे. आजनंतर येणाऱ्या भविष्यात रस्त्यांवर संघर्ष होईल. हा संघर्ष थांबणार नाही. आता आम्ही सुरूवात केली आहे. हा संघर्ष सुरूच राहील.” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आणखी वाचा- …यालाच म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्या तोंडाला काळं फासणं – सचिन सावंत

याशिवाय ”ही जेव्हा हत्या झाली तेव्हा पोलिसांच्या तपासाला सुरूवात होण्या अगोदरच महाराष्ट्र सरकारने सांगून टाकले की, ही मॉब लिंचिंग आहे. हे त्रिकालदर्शी सरकार केव्हापासून झाले. हे स्वप्न यांना कुठून पडतात. हा साक्षात्कार त्यांना कुठून होतो. हाच मुद्दा महाराष्ट्र सरकारला संशयाच्या भोवऱ्यात आणतो. जर त्यांच्या मनात खोट नाही, तर मग सीबीआय तपासाला हे सरकार का घाबरत आहे. सरकारला सीबीआयकडे तपास सोपवावा लागेल. आमच्या साधुंची हत्या झाली त्यात न्याय द्यावा लागेल. महाराष्ट्राच्या भूमीवर आम्ही संतांवर अत्याचार सहन करणार नाही. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी संपूर्णपणे महाराष्ट्र सरकारची आहे. असंही यावेळी राम कदम यांनी सांगितलं.