मुंबई : थायलंडमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमीष दाखवून भारतातील तरुणांना लाओसमध्ये बेकायदेशीररित्या नेऊन त्यांना बेकायदा मदत केंद्रामध्ये काम करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. तेथील मदत केंद्राद्वारे अमेरिका, युरोप व कॅनडातील नागरिकांची सायबर फसवणूक करण्यात येत होती. तेथे अडकलेल्या तरुणांनी याप्रकरणी स्थानिक भारतीय वकिलातीलकडे तक्रार केल्यानंतर या तरुणांची सुटका झाली होती.

तक्रारदार तरुण ठाण्यातील रहिवासी आहेत. त्याच्या तक्रारीवरून लाओसमध्ये राहणारे जेरी जेकब, गॉड फ्री व सनी यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात ठार मारण्याची धमकी देणे, खंडणी वसूल करणे, डांबून ठेवणे व फसवणूक करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ८ च्या पोलिसांनी प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून जेरी जेकब (४६) व गॉड फ्री अल्वारेस (३९) यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा – अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

तक्रारदाराचे एक नातेवाईक विलेपार्ले येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये कामाला होते. त्यांच्यामार्फत तक्रारदाराची ओळख परदेशात नोकरी देणाऱ्या दलालांशी झाली. त्यांनी थायलंडमध्ये नोकरी देण्याचे आमीष दाखवून तक्रारदाराकडून ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याला थायलंडमध्ये पाठवले. तेथून बोटीच्या साह्याने बेकायदेशिररित्या तक्रारदार व तेथे गेलेल्या इतर भारतीय तरुणांना लाओसमध्ये नेण्यात आले. तेथे टास्क देण्याच्या नावाखाली सायबर फसवणूक करणाऱ्या एका मदत केंद्रामध्ये या तरुणांना काम करण्यास भाग पाडण्यात आले. तेथे सुमारे ३० भारतीय तरुण काम करीत होते. त्यांच्यावर जाचक अटी लादून त्यांचा पगार कापण्यात येत होता. नेहमीच्या जाचाला कंटाळून तरुणांनी तेथील भारतीय वकिलातीशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपींनी त्यांचे मोबाइल काढून घेतले. तसेच भारतीय वकिलातीकडे करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. त्यांना खुर्चीला बांधून त्यांचे मोबाइल काढून घेण्यात आले. मोबाइलमधील सर्व तपशीलही आरोपींनी डिलिट केला. तसेच आरोपींनी तक्रारदाराकडून २०० चीनी युआन खंडणी म्हणून घेतले. अखेर स्थानिक भारतीय वकिलातीमार्फत चार तरुणांना भारतात परत आणण्यात आले. भारतात परत आल्यानंतर याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी गुन्हे शाखेचे कक्ष-८ याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.