मुंबई : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने (एमएसआयडीसी) पुणे– छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग प्रकल्प आणि सध्याच्या पुणे – छत्रपती संभाजी नगर महामार्ग सुधारणा प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे – शिरुर उन्नत रस्त्याचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्नत रस्त्याच्या बांधकामासाठीच्या तांत्रिक निविदा सोमवारी खुल्या करण्यात आल्या असून तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. अदानी समुहाच्या अदानी एन्टरप्रायझेस लिमिटेडचाही त्यात समावेश आहे. आता आर्थिक निविदेत कोण बाजी मारते आणि हा प्रकल्प कोण मार्गी लावते हे आर्थिक निविदा खुल्या झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

पुणे – छत्रपती संभाजी नगर प्रवास अतिजलद करण्यासाठी पुणे – छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधण्यासह सध्याच्या पुणे – छत्रपती संभाजी नगर महामार्ग सुधारणा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतला होता. मात्र गेल्या वर्षी हा प्रकल्प एमएसआयडीसीकडे देण्यात आला आहे. त्यानुसार शीघ्रसंचार महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात ५४ किमी लांबीचा पुणे – शिरुर उन्नत रस्ता, तर सध्याच्या महामार्गात ५४ किमी लांबीचा पुणे – शिरुर उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे.

सहा मार्गिकेच्या आणि ७५१५ कोटी रुपये खर्चाच्या या उन्नत रस्त्याच्या बांधकामासाठी एमएसआयडीसीकडून काही महिन्यांपूर्वी निविदा मागविण्यात आल्या होत्या. सोमवारी दुपारी एमएसआयडीसीने तांत्रिक निविदा खुल्या केल्या असून या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती एमएसआयडीसीतील अधिकाऱ्यांनी दिली. तीन कंपन्यांनी या उन्नत रस्त्याच्या कामासाठी उत्सुकता दर्शवली आहे. अदानी एन्टरप्रायझेस लिमिटेड, वेल्सपून एन्टरप्रायझेस लिमिटेड आणि जीआर इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड या तीन कंपन्यांचा त्यात समावेश आहे.

सादर निविदांची आता छाननी केली जाणार असून त्यानंतर आर्थिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे आर्थिक निविदा खुल्या झाल्यानंतरच कोणती कंपनी बाजी मारते हे स्पष्ट होईल. दरम्यान, निविदा अंतिम करत शक्य तितक्या लवकर या उन्नत रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे एमएसआयडीसीचे नियोजन आहे. सहा मार्गिकेचा आणि ७५१५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प ‘बांधा – वापरा – हस्तांतरित करा’ तत्वावर राबविण्यात येत असून प्रकल्पाचा खर्च वसूल करण्यासाठी या महामार्गावर पथकर आकारण्यात येणार आहे.

केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्रालय २००८ पथकर धोरणानुसार या रस्त्यावर पथकर वसूल केला जाणार आहे. तर हा रस्ता खुला झाल्यास पुणे – शिरुर अंतर केवळ ४५ मिनिटांत पार करता येणार आहे. या अतिजलद प्रवासासाठी वाहनचालक – प्रवाशांना २०३० पर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. काम सुरू झाल्यापासून ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास चार वर्षांचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प २०३० मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.