मुंबईः गोरेगाव येथील आरे परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीने खांबाला धडक दिली आणि त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. आरे सब पोलीस ठाण्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गोरेगावमधील आरे परिसरात वास्तव्यास असलेले राधेश्याम दावंडे (३४), विवेक राजभर (२४), आणि रितेश सालवे (२७) दुचाकीवरून शुक्रवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास गोरेगावच्या दिशेने जात होते. त्यावेळी आरे परिसरातील दुसरा मुंडा चौकाजवळील एका वळणावर त्यांचा अपघात झाला. त्यांची दुचाकीने येथील एका खांबाला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर मागे बसलाला दूर फेकला गेला. तर उर्वरित दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तिसरा मित्र गंभीर जखमी झाला होता. त्याला स्थानिकांनी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले, परंतु तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघांनीही हेल्मेट घातलेले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा – मुंबई : कॉफीमध्ये झुरळ सापडल्याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा
हेही वाचा – खारमध्ये एका व्यक्तीला बेकायदेशिररित्या ताब्यात घेतल्याप्रकरणी चार पोलीस निलंबित
याप्रकरणी पोलीसांनी अपघाती मृत्युची नोंद केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असून तिघांचाही मृत्यू झाल्यामुळे न्यायालयाला याबाबतचा अहवाल सादर करून गुन्हा बंद करण्यात येणार आहे.