मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी मध्य वैतरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मध्य वैतरणामधील पाणीपातळी सोमवारी २८२ मीटरहून अधिक वाढल्याने धरणाचे तीन दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले. तीन दरवाज्यातून एकूण ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून ते पाणी मोडकसागर धरणात सोडण्यात येत आहे. तसेच, आसपासच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. सद्यस्थितीत धरणांमध्ये मिळून एकूण ९ लाख ८२ हजार ४१३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मध्य वैतरणा धरणात ८७.२२ टक्के पाणी शिल्लक आहे. सोमवारी पहाटे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, काही धरणक्षेत्रांमध्ये गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळला. गेल्या २४ तासांमध्ये मोडकसागरमध्ये १४६ मिमी, तानसामध्ये १५८ मिमी, मध्य वैतरणामध्ये १३५ मिमी, तर भातसामध्ये १४८ मिमी पावसाची नोंद झाली. मध्य वैतरणामध्ये सोमवारी दुपारी १.१५ च्या सुमारास पाणीपातळी २८२.१३ मीटरवर पोहोचली. त्यावेळी धरणाचे दरवाजा क्रमांक १, ३ आणि ५ उघडण्यात आले. तिन्ही दरवाजे सुमारे ३० सेमीने उघडण्यात आले असून त्यातून ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ते पाणी मोडकसागरमध्ये सोडण्यात येत आहे. तसेच, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आसपासच्या नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव महानगरपालिकेने ही उपाययोजना केली आहे.
सद्यस्थितीत सातही धरणांमध्ये मिळून एकूण ६७.८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. लवकरच धरणे काठोकाठ भरण्याची शक्यता आहे. सध्या उर्ध्व वैतरणामध्ये ७३.१८ टक्के, मोडकसागरमध्ये ८७.३ टक्के, तानसामध्ये ७२.९० टक्के, मध्य वैतरणामध्ये ८७.२२ टक्के, भातसामध्ये ५७.५७ टक्के, विहारमध्ये ४७.९ टक्के, तुळशीमध्ये ४५.२० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्या तीन वर्षांतील पाणीसाठा (पाणीसाठा दशलक्ष लिटरमध्ये)
७ जुलै २०२५ – ९,८२,४१३
७ जुलै २०२४ – २,१०,२०७
७ जुलै २०२३ – २,७१,५२०