मुंबई : मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकावरील पूल १४ जूनपासून सुरू झाला मात्र या पुलावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी मिळून तीन मार्गिका हा समाजमाध्यमावर चेष्टेचा विषय झाला आहे. अंधेरीच्या गोखले पुलाच्यावेळी जसे अभियांत्रिकी चमत्कार म्हणून मुंबईकरांनी पालिकेवर टीका केली तशीच टीका आताही होऊ लागली आहे. पुलावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी तीन मार्गिका असून त्यात दुभाजकही नसल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ होतो आहे.
पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणारा विक्रोळी पूल पूर्ण झाल्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरून पवईकडे जाणाऱ्या वाहनधारकांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे. तसेच घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटरपर्यंतच्या परिघातील वाहनधारकांनाही या पुलाचा उपयोग होणार असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे. हा पूल व्हावा अशी विक्रोळीवासियांची २० वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार आता हा पूल सुरू झाला आहे. मात्र या पुलावरील त्रुटी आता समोर येऊ लागल्या आहेत.
पुलावरून ये जा करणाऱ्या वाहनांसाठी एकूण तीन मार्गिक आखण्यात आल्या आहेत. पण यापैकी येणाऱ्या वाहनांसाठी किती मार्गिका आणि जाणाऱ्या वाहनांसाठी किती मार्गिका यावरून समाजमाध्यमांवर उपरोधिक सल्ले, टीका होऊ लागली आहे. एक मार्गिका जाणाऱ्यांसाठी, एक येणाऱ्यांसाठी आणि एक पार्किंगसाठी किंवा एक मार्गिका गोंधळलेल्यांसाठी अशी टीका होऊ लागली आहे. अर्धी मार्गिका दुचाकीस्वारांसाठी असल्याचा उपरोधिक सल्लाही मुंबईकरांनी दिला आहे. त्यामुळे पूर्व उपनगरातील हा पूल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व – पश्चिम बाजू जोडली आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि विक्रोळी पूर्व बाजूस पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले आहेत. परिणामी, प्रवासाची सुमारे ३० मिनिटे वाचतात, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
विक्रोळी पूल हा १८.३० मीटर रुंद असलेल्या विकास नियोजन रस्त्यावर बांधण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या नियमानुसार त्यांच्या गाड्या सहज जाऊ शकतील याकरीता पुलाच्या बाजूने ६ मीटर रुंद स्लीप रोड ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे पुलाची रुंदी १२ मीटरच होऊ शकली अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. २०११ मध्ये विक्रोळी स्थानकावरील फाटक बंद करण्यात आले. तेव्हाच २०१४ मध्ये १२ मीटर रुंद व ३ मार्गिकेचा पूल प्रस्तावित करण्यात आला होता. पूर्व व पश्चिम जोडणारा हा पूल बांधणे अतिशय आवश्यक होते. पुलावरील वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलीसही तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.