मुंबई : काँग्रेसच्या तीन माजी नगरसेविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. माजी नगरसेविका सुषमा विनोद शेखर, शहाना रिजवान खान, शाबिया इकबाल शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून त्यामुळे काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर मेघवाल समाजाचे रविकुमार धाडिया व किशोर कुमार यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेसमधील आणखी काही माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती. त्यानुसार कॉंग्रेसमधील तीन माजी नगरसेविकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यात दक्षिण मुंबईतील कॉंग्रेसचे दिवंगत माजी नगरसेवक विनोद शेखर यांच्या पत्नी सुषमा विनोद शेखर यांचाही समावेश आहे. सुषमा शेखर या २०१२ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. शहाना रिजवान खान यादेखील २०१२ मध्ये निवडून आलेल्या होत्या आणि राबिया शेख या २००७ मध्ये निवडून आल्या होत्या. या तीनही नगरसेविकांनी नुकताच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मिलिंद देवरा उपस्थित होते.
हेही वाचा – परमीट रुममधील ‘मद्य’भेसळ आटोक्यात येणार! तपासणी यंत्र खरेदीसाठी शासनाची मान्यता
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या मुंबईतील माजी नगरसेवकांची संख्या वाढत आहे. शिवसेनेमध्ये सर्व जाती, धर्माचे नागरिक आहेत. शिवसेना हा पक्ष सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचे काम करतो. मुंबईमध्ये सुरू असलेल्या विकास कामांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. नागरिकांचा पैसा वाया जात नसून रस्ते सुधारत आहे, सौंदर्यीकरणाची कामे सुरू आहेत. सागरी किनारा मार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम लवकरच पूर्ण होईल. रेसकोर्सवर १२० एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पार्क उभारण्यात येणार आहे. अर्बन फॉरेस्ट, वृक्षारोपणाच्या माध्यमातून, तसेच सखोल स्वच्छता मोहिमेमुळे प्रदूषण कमी झाले आहे. तसेच हवेचा दर्जा सुधारला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा – महादेव बुक बेटिंग ॲप प्रकरण : छाप्यांमध्ये ५८० कोटींची मालमत्ता गोठवली
शिवसेना आणि मेघवाल समाजाचे नाते जुनेच असून मुंबईसह ठाण्यात मेघवाल समाज मोठ्या प्रमाणात आहे. मेघवाल समाजाचा घरभाड्याचा विषय लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच सफाई कामगारांच्या मुलांचा परदेशातील शिक्षणासाठी लागणारा खर्च महानगरपालिका करणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना विमा कवच मिळवून देण्यासाठी कामही सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.