मुंबई : हॉलिवूडपटांच्या धर्तीवर भारतीय चित्रपटांना मिळणाऱ्या सेन्सॉर प्रमाणपत्रातही मुलांच्या वयाच्या अनुषंगाने काही श्रेणींचा समावेश असायला हवा, हा मुद्दा गेली अनेक वर्षे चर्चेत होता. मात्र, त्यादृष्टीने अंमलबजावणी होत नव्हती. आता ‘यू/ए’ (युनिव्हर्सल ॲडल्ट) या श्रेणीत तीन नव्या उपश्रेणींची भर पडणार आहे. मुलांच्या वयाच्या विविध टप्प्यांच्या अनुषंगाने ‘यू/ए ७’, ‘यू/ए १३’ आणि ‘यू/ए १६’ अशा तीन नव्या उपश्रेणींनुसार चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी अधिसूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.
चित्रपटाची कथा-आशय आणि मांडणी लक्षात घेता काही चित्रपट ठरावीक वयातील मुलांना पाहणे योग्य ठरेल का ? याची जाणीव पालकांनाही होणे गरजेचे आहे. त्यामुळे एकूणच चित्रपटाची शैली, त्याअनुषंगाने झालेली मांडणी आणि मूळ विषय या सगळ्यांचा विचार करून पालकांच्या मार्गदर्शनाखाली मुले चित्रपट पाहू शकतील अशा आत्ताच्या प्रचलित ‘यू/ए’ श्रेणीतच तीन नव्या उपश्रेणींची भर घालण्यात आली आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नवीन अधिसूचनेनुसार, सात वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची मुले आणि आई -वडिलांच्या मार्गदर्शनाखाली जे चित्रपट पाहू शकतील त्या चित्रपटांना ‘यू/ए ७’, तेरा वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची मुले आई-वडिलांबरोबर जे चित्रपट पाहू शकतील त्या चित्रपटांना ‘यू/ए १३ ’ आणि सोळा वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठीच्या चित्रपटांना ‘यू/ए १६ ’ श्रेणीतील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यापुढे चित्रपटांचे वर्गीकरण या श्रेणींनुसार केले जाणार आहे.
चित्रपटांचे वर्गीकरण ‘यू/ए ७ ’ , यू/ए १३ ’ आणि ‘यू/ए १६ ’ या श्रेणींनुसार झाले असल्याने एखादा चित्रपट आपल्या मुलाला पाहू द्यावा की नाही? याबद्दलचा निर्णय घेणे पालकांना शक्य होणार आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही अधिसूचना जारी करताना स्पष्ट केले आहे.
चित्रपटांसाठीच्या प्रमाणपत्र श्रेणी
U (Universal): सर्व वयोगटांसाठी योग्य.
U/A (Universal Adult): पालकांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुले पाहू शकतात.
A (Adult): फक्त प्रौढ प्रेक्षकांसाठी.
S (Special): विशिष्ट वर्गासाठी.