मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात एका सराफाला दमदाटी करून त्याच्याकडील ३० हजार रुपये बळजबरीने काढून घेणाऱ्या तीन रेल्वे पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. याशिवाय अन्य चार पोलिसांची मुख्यालयात बदली करण्यात आली. जुलै महिन्यातही ३ हजार रुपयात तडजोड करणाऱ्या एका पोलिसाला निलंबित करण्यात आले होते.
तक्रारदार कुलदीप कुमार सोनी (३७) हे सराफ असून ते राजस्थान मध्ये राहतात. ते १ ऑगस्ट रोजी आपल्या मुलीसोबत सोन्याच्या एका प्रदर्शनासाठी मुंबईत आले होते. त्यांनी आपल्या सोबत १४ ग्रॅमची वजनाची सोन्याची लगड आणली होती, ती एका सराफाला दाखवून त्यापासून नमुना दागिना बनवायचा होता. सोनी १० ऑगस्ट रोजी पुन्हा राजस्थानला जाण्यासाठी निघाले होते. रात्री १०.३० च्या सुमारास मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात तीन पोलिसांनी त्यांना अडवले आणि बॅग तपासली. पोलिसांना सोनी यांच्या बॅगेत सोन्याची लगड आणि ३१ हजार ९०० रूपये आढळले. त्याबद्दल पोलिसांनी जाब विचारला. माझ्याकडे सोन्याच्या पावत्या असल्याचे सोनी यांनी सांगितले. मात्र तरी पोलिसांनी सोनी यांना मुलीसमोर शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर फलाटाजवळच्या एका अंधाऱ्या खोलीत नेऊन दमदाटी करून अटक करण्याची धमकी दिली. ट्रेन सुटण्याच्या वेळी त्या तीन पोलिसांनी सोनी यांच्याकडील ३० हजार रुपये काढून घेतले आणि त्यांना सोडून दिले.
गुन्हे शाखेकडे तपास
राजस्थानला परत गेल्यावर सोनी यांनी या प्रकाराबाबत रविवारी रतनगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा गुन्हा मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) हस्तांतरित करण्यात आला. सोनी यांच्या तक्रारीवरून मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११९ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास रेल्वे गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.
तीन पोलीस निलंबित, चौघांची बदली
रेल्वे पोलीस आयुक्तांनी सराफाला लुटणाऱ्या तिघा पोलिसांना मंगळवारी निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू केली. त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड, हेड कॉन्स्टेबल जगताप आणि भोसले यांचा समावेश आहे. हे पोलीस मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्याशिवाय या प्रकरणात आणखी चार पोलिसांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी दिली.
वसईतील तडतोड प्रकरणात पोलीस निलंबित
चर्चगेट – विरार विशेष महिला लोकलमध्ये मंगळवार १७ जुन रोजी कविता मेंदाडकर (३३) या महिलेला ज्योती सिंगने (२७) मारहाण केली होती. यात कविता मेेंदाडकर जखमी झाल्या होत्या. मात्र वसई रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल न करता ३ हजार रुपये घेऊन तडजोड करून प्रकरण मिटवले होते. या प्रकरणी पोलीस हवालदार एकनाथ माने याला अखेर निलंबित करण्यात आले.