मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पायाभूत सुविधा क्षेत्रात काही तरी भरीव कामगिरी आपण करत असल्याचे दाखविण्यासाठी महायुती सरकार नियोजनशून्य पद्धतीने विकासाचे आराखडे तयार करत असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी नुकतीच केली.

सध्या नवरात्रोत्सव सुरू असताना व अवघ्या काही दिवसावर दिवाळी आली असताना एल्फिस्टन पूल पाडण्याच्या निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे. त्या निर्णयामुळे सध्या परळ, शिवाजी पार्क, माहीमपासून ते थेट दादर – माटुंगापर्यंत नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

एकीकडे पेट्रोलचा अतिरिक्त अनावश्यक वापर, प्रदूषण, तसेच जनतेच्या अमूल्य वेळेचे नुकसान होत असून, दुसरीकडे आधीच आर्थिक तोट्यात असलेल्या महाराष्ट्राला अशा चुकीच्या निर्णयांमुळे महायुती सरकार आणखी आर्थिक तोट्याच्या दरीत टाकत आहे, अशी टीका गाडगीळ यांनी केली आहे. ऐन दिवाळीत इथे चेंगराचेंगरीचा धोका उद्भवण्याची शक्यताही गाडगीळ यांनी व्यक्त केली.