मुंबई: उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांमधील राज्य सरकारच्या अधिपत्याखालील शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार या धोरणाची व्यवहार्यता तपासून सरकारला शिफारस करण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
वाढत्या नागरीकरणांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रेल्वे गाडी पकडताना किंवा गाडीला लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अपघाती मृत्यूच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. उपगरीय रेल्वेमध्ये तीन वर्षात विविध दुर्घटनांमध्ये तब्बल ७ हजार ५६५ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ठाणे-कल्याण दरम्यान गेल्या वर्षभरात ७४१ प्रवाशांना आपलेे प्राण गमवावे लागले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील रेल्वे अपघात पाच प्रवाशांचा मृत्यू तर नऊ प्रवासी जखमी झाले होते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यावेळी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक घेऊन उपाययोजना करण्याची ग्वाही सरकारने दिली होती.
मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यामधील सकाळी व सायंकाळी होणारी प्रवाशांची गर्दी कमी व्हावी या दृष्टीने कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याची विनंती रेल्वे प्रशासनाने मुंबईतील केंद्र सरकार, राज्य सरकार, खाजगी संस्था यांच्या कार्यालयांना केली आहे. त्यानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांमधील राज्य शासनाच्या अधिपत्त्याखालील सरकारी कार्यालयाच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू झाल्या आहेत. या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये वित्त, परिवहन, नगरविकास, सामान्य प्रशासन(सेवा), उद्योग, कामकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव, मुख्य मंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, परिवहन आयुक्त, मुंबईतील दोन्ही जिल्हाधिकारी यांचा या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. समितीला कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करुन तीन महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारचा प्रयोग यशस्वी ठरल्यास केंद्र आणि खाजगी कार्यलयांच्या वेळाही बदलल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली.