मुंबई : आपल्या परिसरातील कर्तृत्ववान व प्रेरणादायी स्त्रियांची नामांकने ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार- २०२२’करिता पाठवण्यासाठीचा बुधवार, १४ सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे. बुधवारनंतर प्राप्त होणारे नामांकनांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत.  

दरवर्षी नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांमधील असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या नऊ स्त्रियांना हे पुरस्कार प्रदान केले जातात. एखाद्या वेगळय़ा वा पुरुषप्रधान क्षेत्रात स्त्रीने केलेले कार्य, प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेल्या व्यवसायातून इतर स्त्रियांसाठी निर्माण केलेल्या रोजगाराच्या संधी, शिक्षणाचा घेतलेला वसा, विज्ञान-तंत्रज्ञान व संशोधनात गाठलेली उंची, शेती वा ग्रामीण विकासातली भरारी किंवा उभारलेले सामाजिक काम, असे कोणतेही विधायक काम हाती घेतलेल्या सामान्य स्त्रियांची माहिती या पुरस्कारांसाठी पाठवता येणार आहे. राज्यभरातून या पुरस्कारांसाठी नामांकने प्राप्त होत आहेत.

सर्व नामांकनांतून तज्ज्ञ परीक्षक समितीने निवडलेल्या नऊ स्त्रियांना ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’चा सन्मान प्रदान केला जातो. गेली आठ वर्षे हा उपक्रम सुरू आहे.  नवरात्रीत नऊ दिवस दररोज यातील एका पुरस्कारप्राप्त स्त्रीची ‘लोकसत्ता’तून ओळख करून दिली जाणार आहे, तसेच त्यानंतर होणाऱ्या रंगतदार सोहळय़ात नामवंतांच्या हस्ते नवदुर्गाचा सन्मान केला जाणार आहे.

माहितीत काय असावे? सामान्य नागरिकांमधील जी कर्तृत्त्ववान स्त्री ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’साठी पात्र ठरू शकेल असे आपल्याला वाटते अशा स्त्रीचे नाव सुचवून वाचक तिची माहिती पाठवू शकतात. ही माहिती ‘लोकसत्ता’कडे सुमारे ५०० शब्दांत आणि केवळ मराठीतच लिहून वा टाइप करून पाठवावी. इंग्लिशमध्ये पाठवलेले अर्ज अपात्र ठरवले जातील. अर्जात संबंधित स्त्रीचे वेगळेपण, तिचा संघर्ष, विधायक काम आणि प्रेरणादायित्व याची माहिती देणे आवश्यक आहे. त्याबरोबर त्या स्त्रीचे छायाचित्र, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडीही पाठवणे आवश्यक.

माहिती कुठे पाठवाल?

माहिती loksattanavdurga@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा टपालाने पुढील पत्त्यावर पाठवावी. ‘लोकसत्ता- महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०’. ई-मेलमध्ये आणि टपालाने पाठवल्या जाणाऱ्या पाकिटांवर ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२२’साठी असा स्पष्ट उल्लेख करावा. माहिती प्राप्त झाल्यानंतर दुर्गाची निवड करण्याच्या काळात ‘लोकसत्ता’कडून त्याविषयी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार वा दूरध्वनी संवाद केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. पुरस्कारप्राप्त दुर्गाची माहिती ‘लोकसत्ता’मध्ये थेट २६ सप्टेंबरपासून प्रसिद्ध केली जाईल.

हे महत्त्वाचे :

*  माहिती फक्त मराठीत, नोंदी स्वरूपात आणि एकदाच पाठवावी.

*  संबंधित स्त्रीचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे आणि त्या क्षेत्रात उच्च स्थानी पोहोचलेले असावे.

*  माहिती पाठवण्याची अंतिम तारीख आहे १४ सप्टेंबर २०२२.