मुंबई : टोरेस गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासात फरार परदेशी नागरिकांनी गैरव्यवहारातून कमावलेले १७७ कोटी ११ लाख रुपये व्यवहारात आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ईडीने नुकतीच १३ व्यक्ती आणि कंपनीविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या गैरव्यवहारात मुंबई व परिसरातील सुमारे १४ हजार १५७ गुंतवणूकदारांची १५० कोटी रुपये गुंतवले होते. हा संपूर्ण गैरव्यवहार प्लाटिनम हेर्न या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला.
प्लाटिनम हेर्न या कंपनीने हिरे विक्रीच्या नावाखाली सर्व गैरव्यवहार केला. या प्रकरणात अल्पेश खारा (हवाला ऑपरेटर), सागर मेहता, ओलेक्सांद्र झापीचेंको ऊर्फ ॲलेक्स, ओलेना स्टोईन, व्हिक्टोरिया कोव्हालेन्को, ताझागुल खासातोवा ऊर्फ तानिया, लल्लन जमेदार सिंह, तौसीफ रियाज, अभिषेक गुप्ता आणि सर्वेश सुर्वे प्रमुख आरोपी आहेत.
याप्रकरणी अभिषेक गुप्तालाही आरोपी केले आहे. त्याचा गैरव्यवहारावर उघड दावा करण्यात येत होता. तसेच आरोपी लल्लन सिंह याने बनावट कागदपत्रे बनवल्याचा संशय आहे. गैरव्यवहारातील आरोपी लोकांकडून रोख रक्कम गोळा करून ती हवाला ऑपरेटर खारा याच्याकडे देत होते. त्यांतर तो यूएसडीटी या कूट चलनाच्या माध्यमातून परदेशात रक्कम पाठवत होता. आरोपपत्रानुसार काही रक्कम खारा व त्याच्या पत्नीच्या मालकीच्या सराफ दुकानाच्या बँक खात्यावरही जमा झाले झाले आहेत. त्यानंतर ती रक्कम खाराची पत्नी व मुलाच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आले, त्यानंतर त्या रकमेद्वारे गिरगावमधील खेतवाडी येथे तीन सदनिकांची नोंदणी करण्यात आली.
११ जण फरार
या प्रकरणात ८ युक्रेनियन नागरिक आणि १ तुर्की नागरिकासह एकूण ११ आरोपी अद्याप फरार आहेत. मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, इंटरपोलने परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. पोलिसांनी संशयित सूत्रधार ओलेना स्टोइयान, व्हिक्टोरिया कोव्हालेन्को, मुस्तफा कराकोच, ओलेक्झांडर बोराविक, ओलेक्झांडर झापिचेंको, ओलेक्झांड्रा ब्रुंकीव्स्का, ओलेक्झांड्रा त्रेडोखिब, आर्टेम ओलिफरचुक आणि इयुर्चेंको यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.