मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहायल अर्थात राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या काहीशी रोडावली असल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे. गेल्या तीन वर्षात नवीन प्राणी आणण्यात अपयश आल्यामुळे ही संख्या रोडावत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिंह, झेब्रा आणण्याचे प्रयत्न कमी पडल्यामुळे व विदेशी प्राणी आणण्याकरीता नियमावली आड येत असल्यामुळे नवीन प्राणी येऊ शकलेले नाहीत.

भायखळा येथील मुंबई महापालिकेच्या प्राणी संग्रहालयाला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. दरदिवशी साधारण दहा ते पंधरा हजार पर्यटक या ठिकाणी भेट देतात. शनिवारी व रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी ही संख्या २० हजाराच्याही पुढे जाते. वार्षिक सुमारे २५ लाखांच्यावर पर्यटक तेथे भेट देतात. मात्र गेल्या दोन वर्षात ही संख्या कमी होऊ लागली आहे.

भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात पेंग्विन येण्यापूर्वी दरवर्षी सुमारे १२ लाखापर्यंत पर्यटक भेट देत होते व सुमारे १ कोटीपर्यंत वार्षिक महसूल मिळत होता. मात्र पेंग्विन आल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढली. तसेच २०१७ मध्ये मुंबई महापालिकेने प्रवेश शुल्कही वाढवल्यामुळे वार्षिक उत्पन्न वाढले होते. त्यामुळे प्राणीसंग्रहालयाला वार्षिक ५ ते सात कोटींचा महसूलही मिळू लागला होता. तर टाळेबंदीनंतर २०२२-२३ मध्ये प्राणी संग्रहालयात पर्यटकांची विक्रमी संख्या नोंदवली गेली व महसूलही ११ कोटींच्या पुढे गेला. मात्र ही संख्या गेल्या आर्थिक वर्षात कमी झाल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान, याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की टाळेबंदीनंतर मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडू लागले व त्यामुळे विक्रमी संख्या नोंद झाली. त्याच्याशी तुलना केली तर गेल्यावर्षीची संख्या घटलेली दिसते. त्याचबरोबर प्राणी संग्रहालयात गेल्या काही कालवाधीपासून नवीन प्राणी आणता आलेले नाहीत. त्यामुळे देखील पर्यटक संख्या कमी झालेली असू शकते. केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या नियमानुसार विदेशी प्राणी आणण्यासाठी देशी प्राण्यांची संख्या वाढवावी लागते. त्याचा समतोल राखावा लागतो. म्हणूनच आम्ही मत्स्यालय उभारणार असून त्यानंतर आणखी विदेशी प्राणी समाविष्ट करता येतील, असेही त्यांनी सांगितले.

प्राणी संग्रहायलयात आता शक्ती, करिश्मा ही वाघाची जोडी ,अस्वल, हरणे, अजगर, तरस आणि विविध प्रकारचे पक्षीही पाहायला मिळत आहेत. प्राणी संग्रहालयात सध्या २१ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत. तर सिंह आणि झेब्रा आणण्याचा प्रकल्प मात्र रखडलेला आहे.

२०१७ मध्ये प्रवेश शुल्क वाढवण्यात आले होते. सध्या लहान मुलांना २५ रुपये, प्रौढांना ५० रुपये तर कौंटुंबिक सहलींना एकत्रित १०० रुपये असे शुल्क आहे.

वार्षिक संख्या

वर्ष ………………….. .पर्यटक ……….. महसूल

२०२२-२३ ……….. २९ लाख ५६ हजार ५८९ ……… ११ कोटी ५९ लाख ४७ हजार

२०२३-२४ …………. २८ लाख ९७ हजार ६७९ ……. ११ कोटी ४६ लाख २९ हजार

२०२४-२५ …………..२३ लाख ५७हजार ८३१ ………….. ९ कोटी १८ लाख ७५ हजार

महिना ….. पर्यटक …. महसूल

एप्रिल २०२५ ….. २ लाख ३९ हजार ….. ९३ लाख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१५ मे २०२५ पर्यंत ……१ लाख ५५ हजार ……. ५९ लाख ६६ हजार