गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेने चेंबूरच्या आर. सी. मार्गावर रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यातच या मार्गावरून अवजड वाहनांची मोठ्या संख्येने जे-जा सुरू आहे. याचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून या मार्गावर दुपारी १ वाजेपर्यंत अवजड वाहनांना जाण्या-येण्यास बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा- गोष्ट असामान्यांची Video: भारतातील पहिल्या तृतीयपंथी फोटोजर्नलिस्ट – झोया लोबो

चेंबूरमधील आर. सी. मार्गावर २००९ मध्ये मोनो रेलच्या कामाला सुरुवात झाली. या कामामुळे येथील रस्त्याची मोठी दूरवस्था झाली होती. परिणामी, वाहन चालकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्त्याच्या दूरवस्थेमुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने टप्याटप्याने येथील रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतली. सध्या या मार्गावरील चेंबूर कॉलनी परिसरातील रस्त्याचे काम सुरू आहे. परिणामी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.

हेही वाचा- विश्लेषण: ‘म्हाडा’ची एकापेक्षा अधिक घरे घेता येतात का? प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही योजना काय?

चेंबूरच्या माहुल परिसरात अनेक तेल आणि गॅस कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये रोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. ही सर्व वाहने चेंबूर कॉलनी परिसरातूनच जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे. सकाळी आणि दुपारी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते आणि विद्यार्थ्यांना बराच वेळ कोंडीत अडकून रहावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि दुपारी १२ ते १ दरम्यान या मार्गावर अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.