मुंबई : ब्रिटिशकालीन कर्नाक पूल धोकादायक बनला असून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे धोकादायक कर्नाक उड्डाणपुलावरून वाहनांची रहदारी सुरूच आहे. मध्य रेल्वेने मुंबई वाहतूक पोलिसांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र त्यानंतरही हा उड्डाणपूल बंद करण्याबाबत मुंबई वाहतूक पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेला निर्णय घेता आलेला नाही.
काही वर्षांपूर्वी आयआयटी मुंबईने रेल्वेच्या हद्दीतील उड्डाणपुलांची संरचनात्मक तपासणी केली होती. या तपासणीअंती हँकॉक, कर्नाक उड्डाणपुलांसह अन्य काही उड्डाणपूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले होते. यापैकी ब्रिटिशकालीन हॅंकाॅक पूल पाडून त्याची उभारणीही करण्यात आली. हा पूल १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला. मात्र सीएसएमटी आणि मशीद बंदर दरम्यानचा धोकादायक बनलेल्या कर्नाक बंदर उड्डाणपुलावरून आजही वाहतूक सुरूच आहे. धोकादायक बनलेल्या कर्नाक बंदर उड्डाणपुलाचा आपल्या हद्दीतील भाग पाडण्याबाबतची माहिती मध्य रेल्वेने मुंबई वाहतूक पोलिसांना जुलैच्या पहिल्या आठवड्यातच दिली होती.
मात्र हा पूल पाडल्यास दक्षिण मुंबईतील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. तसेच हॅंकाॅक पूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतरच कर्नाक पूल पाडण्यात यावा, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले होते. हँकॉक पूल १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र धोकादायक कर्नाक उड्डाणपूल बंद करण्याबाबत अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या धोकादायक उड्डाणपुलावरून वाहतूक सुरूच आहे.
मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने कर्नाक उड्डाणपूल बंद करण्यासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र जारी करण्याची विनंती केली आहे. कर्नाक पुलाची अवस्था आणि पूल तोडण्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांना देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने हा पूल बंद करण्याबाबत ‘ना हरकत’ प्रमाणपत्र अर्ज करावा, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हँकॉक आणि कर्नाक पूल हे दोन्ही दक्षिण मुंबईतील पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारे महत्त्वाचे पूल आहेत, हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद केल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता होती. त्यामुळे कर्नाक पूल तोडण्याआधी हॅंकाॅक पूल सुरू होणे गरजेचे होते. आता हँकॉक पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. मात्र कर्नाक पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय अधांतरीच आहे.
कर्नाक उड्डाणपुलाला तडे गेले आहेत. या पुलाचा पाया खराब झाला असून त्यांचा खांबालाही तडे आहेत.