टोलनाक्यांवरील पथकर वसुली शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली आणि विविध महत्त्वाच्या व मोठय़ा टोलनाक्यांवर पुन्हा वाहनांच्या रांगांची रांगोळी उमटली. मुंबई परिसरातील महत्त्वाच्या टोलनाक्यांवर साधारणत: सारखेच चित्र होते.. ते म्हणजे व्यवस्थेतील गोंधळाचे, चलनचणचणीचे, त्यामुळे लागलेल्या रांगांचे आणि वाहनचालकांना होत असलेल्या मनस्तापाचे..
दहिसर, मुलुंड – सुट्टय़ा पैशांसाठी बाचाबाची
मुंबई : मुंबईच्या वेशीवरील मुलुंड आणि दहिसर येथील टोलनाक्यांवर सुट्टय़ा पैशांसाठी वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. या वादात आणि टोल भरण्यात होत असलेल्या विलंबामुळे सकाळी टोलनाक्यांवर वाहनांची मोठी रांग लागली. काही नाक्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचीही वेळ ओढवली होती.
[jwplayer IQjwQm3V]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५००-१००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली आणि नागरिकांनी आपल्याकडून ५००-१००० रुपयांच्या नोटा बँकेत भरण्यासाठी वा चालतील त्या ठिकाणी संपविण्याचा सपाटा लावला होता. सुट्टय़ा पैशांची चणचण निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता. या नोटाबंदीचा फटका टोल नाक्यांनाही बसला.
अखेर काही दिवसांसाठी टोलनाके बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुन्हा टोल वसुली सुरू करण्यात आली. त्यामुळे मुंबईच्या वेशीवरील मुलुंड येथील एलबीएस रोड आणि पूर्व द्रुतगती मार्ग, तसेच दहिसर येथील टोलनाक्यांवर शनिवारी सकाळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहनचालक दोन हजार रुपयांची नोट टोल भरण्यासाठी पुढे करीत होते.
मात्र टोलनाक्यांवरील कर्मचारी सुट्टे पैसे देण्यास असमर्थता दर्शवीत होते. त्यामुळे वाहनचालक आणि नाक्यांवरील कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडत होत्या.
या वादावादीत बराच वेळ वाया जात होता. त्यामुळे टोलनाक्यांवरील वाहनांच्या रांगा लांबपर्यंत पोहोचल्या होत्या.
नियमितपणे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या काही वाहनचालकांनी महिन्याचा पास घेणे पसंत केले. मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यावर स्वाइप यंत्रे बसविल्याने काही वाहनचालकांनी क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे टोलचा भरणा पसंत केले.
ठाणे – सुसाट प्रवासाला लगाम
ठाणे: ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावरील नाक्यांवर शुक्रवारी मध्यरात्रीपासून पथकर वसुली पुन्हा सुरू झाल्यामुळे वाहनांच्या सुसाट प्रवासाला लगाम बसला. आनंदनगर, खारेगाव आणि मॉडेला चेकनाका येथे टोलनाक्यांवर शनिवारी सकाळी तसेच सायंकाळी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे पथकर नाक्यांवर वाहनांची मोठय़ा प्रमाणात कोंडी झाली नसली तरी सोमवारी मात्र या भागात कोंडी होण्याची शक्यता आहे.
सुट्टय़ा पैशांमुळे वाहनचालकांसोबत वाद होऊ नये म्हणून पथकर नाक्यावरील व्यवस्थापनाने सुट्टे पैसे उपलब्ध केले होते. मात्र दुपापर्यंत ते संपत आल्याने पेच निर्माण झाला. येथे काही कारचालक तर धनादेश देत होते, मात्र ते स्वीकारले जात नव्हते. धनादेश वटला नाही तर आम्ही काय करणार, असा टोल कर्मचाऱ्यांचा सवाल होता.
व्हॅल्यू बेस्ड कार्ड
दहिसर, ऐरोली, वाशी, मुलुंड चेकनाका, आनंदनगर चेकनाका, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे या पाच ठिकाणी एमईपी या कंपनीचे टोलनाके आहेत. सध्या येथे व्हॅल्यू बेस्ड कार्ड सुविधेचा वापर केला जात आहे. या कार्डामध्ये ३५० रुपयांचा रीचार्ज करावा लागतो. त्यानंतर हे कार्ड एमईपीच्या वरील पाचही टोलनाक्यावर वैध आहे. या ३५० रुपयांमध्ये १० फेऱ्यांचा समावेश आहे. दहा फेऱ्या झाल्यानंतर मात्र या कार्डामध्ये पुन्हा पैसे भरावे लागत आहेत. ३५० रुपयाचे हे कार्ड घेताना जुन्या ५००च्या नोटा स्वीकारल्या जात आहेत.
आठ दिवसांपासून हॉटेल, छोटे व्यापारी यांच्याकडून ६० हजाराचे सुट्टे पैसे गोळा केले होते. मात्र दुपारी १२.३० पर्यंत ५० हजार संपले. – रवींद्र राजपूत, व्यवस्थापक, चेकनाका
खारघर, खालापूर – स्वाइप यंत्रांचा तुटवडा
पनवेल : जुन्या नोटा चालत नाहीत, शंभरच्या नोटा द्या, स्वाइप यंत्रे अजून पूर्ण लागलेली नाहीत, हे पटवून देताना टोल कर्मचाऱ्यांची आणि वाहनचालकांची हमरीतुमरी खारघर आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाक्यांवर पाहायला मिळाली. टोल खिडकीवरील वाद, प्रश्नोत्तरे यांत वाया जाणाऱ्या काळामुळे वाहनांच्या रांगेने तीन किलोमीटरचा टप्पा कधी गाठला हे पोलिसांनाही समजले नाही. टोलनाक्यावर गर्दी वाढली की वाहने सोडून द्यावी या नियमाला येथे बगल देण्यात आली आणि मध्यरात्री तीन वाजल्यापासून सक्तीची टोलवसुली जोरदार अमलात आल्याचे चित्र या नाक्यांवर पाहायला मिळाले.
पाचशे, हजार रुपयांच्या जुन्या नोटा टोलनाक्यांवर ३१ डिसेंबपर्यंत चालतील अशी अपेक्षा वाहतूकदार आणि वाहनचालकांना होती, परंतु सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शुक्रवारची मध्यरात्र ही या जुन्या नोटांसाठी टोलनाक्यांवरील अखेरची होती. त्यामुळे अवजड वाहनचालकांनी मुंबईच्या प्रवेशद्वारावर शिरताना पहिल्यांदा खारघर, वाशी येथील टोलनाक्यांवर टोल जमा करण्याची खिडकी आल्यावर पाचशे रुपयांची जुनी नोट दाखवत आम्हाला निर्णय माहीत नसल्याची सबब दिली. मात्र टोलवसुली करणाऱ्यांनी सरकारचा निर्णय असल्याचे स्मरण करून दिल्यावर संबंधित वाहनचालक टोलच्या खिडकीवरील कामगारांना दोन हजारांची नवीन नोट पुढे करत होते. दोन हजारांचे सुट्टे कुठून द्यावे, असा प्रश्न टोलनाक्यावरील कामगारांना पडल्यामुळे टोल भरणा करणाऱ्या खिडक्यांवरील तंटे वाढले. शंभर रुपयांची नोटच द्यावी अशी सक्ती खारघर टोलनाक्यावर केली जात होती. शुक्रवारी सुमारे १५ हजार अवजड वाहने मुंबईहून पुण्याच्या दिशेला गेली. खासगी कंपनीचे मिनी बसचालक जुनी पाचशे रुपयांची नोट टोलनाक्यावर पहिल्यांदा पुढे करत होते. ती नाकारल्यावर डेबिट कार्ड पुढे करत होते. मात्र आठ पदरी मार्गावर दिवसरात्र टोलवसुली करणाऱ्या खारघरच्या टोलनाक्यावर एकही स्वाइप यंत्र नसल्याचे यानिमित्ताने उजेडात आले. खालापूरच्या टोलनाक्यावर मात्र दहा स्वाइप यंत्रे शनिवारी बसविण्यात आली होती. तेथे डेबिट कार्डने टोल भरणाऱ्यांची संख्या मोठी होती.
सुटे पैसे कसे देणार?
आमच्या टोल कंपनीचे बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. तेथून फक्त दिवसाला पन्नास हजार रुपयांची रोकड काढता येते. त्यातही सगळ्याच कमी किमतीच्या नोटा दिल्या जात नाहीत. तेव्हा वाहनचालकांनी दिलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा कशा सुट्टय़ा करून देणार, असा सवाल ‘एसपीटीपीएल’चे व्यवस्थापक अजयकुमार यादव यांनी केला. दोन दिवसांपूर्वी बँकेकडे स्वाइप मशीनची मागणी केली आहे. लवकरच खारघर व कळंबोली टोलनाक्यांवर स्वाइप मशीनने पथकर स्वीकारला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
वाशी, ऐरोली – तीन-चार किलोमीटपर्यंत रांगा
नवी मुंबई : वाशी हा मुंबईच्या प्रवेशद्वारावरील महत्त्वाचा टोलनाका. शीव-पनवेल महामार्गावरील या टोलनाक्यावर शनिवारी सुटय़ा पैशांच्या तुटवडय़ामुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा झाला. मुंबईकडे जातानाच्या दिशेने वाशी टोलनाक्यावर जवळपास ३ ते ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. नवी मुंबईकडे जातानादेखील वाशी पुलावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होती. वाहनधारक आणि टोल वसुली कर्मचारी यांच्यामध्ये सुट्टय़ा पैशांमुळे, वाहतूक कोंडीमुळे खटके उडत होते.
ऐरोली टोलनाक्यावर मात्र वाहतूक सुरळीत होती, मात्र तेथेही दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येत नसल्यामुळे आणि वाहनचालक सुटे पैसे देत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवत होते. अनेकदा वाद घालण्याऐवजी टोल न घेताच वाहन सोडून देण्याचा पवित्रा टोल कर्मचारी घेत होते.
[jwplayer WpcUyO9F]