मुंबई : हेल्मेटसक्ती व अन्य वाहतूक नियमांच्या अंमलबजाणीच्या नावाखाली वाहतूक पोलिसांकडून नाक्यानाक्यांवर सुरू असलेल्या वसुलीचे तीव्र पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. मनमानी आणि नियमबाह्य वसुलीबाबत पोलिसांना आवरावे अशी मागणी सदस्यांनी केली. सभागृहाच्या भावनांशी सहमती दर्शविताना बदल्यांसाठी देणारे वसुली करीत आहेत. रस्त्यावरील पोलीस शिपायांपेक्षा त्यांना ‘लक्ष्य’ देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे सांगत पीठासीन अधिकारी संजय शिरसाठ यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
नाशिक परिक्षेत्रात वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटसक्तीच्या नावाखाली दंड आकारणी होत असल्याबाबत शांताराम मोरे व प्रकाश आबिटकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी नाशिक परिक्षेत्रात वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटसक्ती ही नियमानुसार करण्यात आली असून पोलीस वसूल करीत असलेला दंड सरकारकडे जमा होत असल्याचे सांगितले. तसेच मोघम तक्रारी करून, पोलिसांना वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप करून वाहतूक पोलिसांची बदनामी करू नका. योग्य तक्रार असेल तर चौकशी करून कारवाई करू, असेही राज्यमंत्र्यांनी सदस्यांना सुनावले. त्यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत राज्यभरात वाहतूक पोलिसांकडून लोकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप करण्यात आला. सदस्य आणि राज्यमंत्री यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू असतानाच पीठासीन अधिकारी संजय शिरसाठ यांनी चर्चेत हस्तक्षेप करीत सरकारला खडे बोल सुनावले. राज्यात वाहतूक पोलिसांबाबत सर्वत्र असेच चालू आहे. मात्र याला वाहतूक पोलीस शिपाई जबाबदार नसून तेथील वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. बदल्या कशा होतात हे सर्वानाच माहीत आहे. तडजोडीने नियुक्ती दिली जात असून त्यासाठी जो देतो ते घेतो, हे मी जबाबदारीने सांगतो. त्यामुळे छोटय़ा शिपायाला धरण्यापेक्षा बदल्यांच्या सर्कलमध्ये असलेल्यांना जबाबदार धरा, असे सांगत हेल्मेटसक्ती आणि नियमबाह्य दंडआकारणी याबद्दल गृह विभागाने आलेल्या तक्रारीदेखील तपासून पाहाव्यात अशा सूचना दिल्या.
आमदाराची गाडी मंत्र्याच्या नावावर
एका आमदाराची गाडी चक्क परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर करण्याचा प्रताप जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी सभागृहात उघडकीस आली. भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी औचित्याच्या माध्यमातून ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणताना आपली इनोव्हा (एमएच १९ सीझेड ५१३०) ही गाडी प्रादेशिक परिवहनच्या अधिकाऱ्यांनी परस्पर परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर केली आहे असे सांगितले.