scorecardresearch

सिग्नल तोडल्याने झाला माटुंगा येथील रेल्वे अपघात!

गदग एक्स्प्रेसच्या लोको पायलट आणि त्याचा सहकाऱ्याने सिग्नल लाल असतानाही तो ओलांडला

माटूंगा रेल्वे स्थानकाजवळ काल(शुक्रवार) रात्री दादरहून निघालेल्या पुदुच्चेरी एक्सप्रेसला सीएसएमटीहून निघालेल्या गदग एक्सप्रेसने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये पुदुच्चेरी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरुन घसरले. यामुळे जलद मार्गावरील रेल्वेमार्गाचे नुकसान झाले. दरम्यान, हा प्रकार सिग्नल तोडल्याने घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गदग एक्सप्रेसच्या लोको पायलट आणि त्याचा सहकाऱ्याने सिग्नल लाल असतानाही तो ओलांडला, नीट पाहिला नाही. त्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

दादर स्थानकातून बाहेर पडताच पुदुच्चेरी एक्स्प्रेसला ‘सीएसएमटी’हून आलेली गदग एक्स्प्रेस धडकली. त्यामुळे पुदुच्चेरी एक्स्प्रेसचे मागील एस १, एस २ आणि एस ३ हे तीन डबे रुळावरुन घसरले. या धडकेचा आवाज इतका मोठा होता की, दोन्ही एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी गाडय़ांबाहेर उडय़ा मारल्या़ अपघातात एस-३ डब्याचे मोठे नुकसान झाले. हा डबा एका बाजूला खांबावर कलंडला होता.

मुंबईत मध्य रेल्वे मार्गावरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले, ठाणे पल्याड रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी

यामुळे अप व डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. या मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकल प्रवाशांचेही हाल झाले. या घटनेनंतर दोन्ही गाडय़ांच्या प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. पुढील प्रवास होणार काही नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Train accident at matunga due to signal breakage msr