scorecardresearch

दळण आणि ‘वळण’ : रेल्वे वाहतुकीचे दिग्दर्शक!

रेल्वेवर जिथे जिथे रुळांचं इंटरसेक्शन किंवा क्रॉसिंग असतं, तिथे रेल्वेची सिग्नल यंत्रणा किचकट असते.

mumbai local railway
संग्रहित छायाचित्र

मध्य तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील एका स्थानकात असलेल्या ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीमच्या खोलीत दर सकाळ आणि संध्याकाळी युद्धसदृश परिस्थिती असते. या प्रणालीसमोर बसलेले कंट्रोलर ‘शीर मुंडी कापलेल्या मुरारबाजीच्या’ आवेशात तोंडाचा दांडपट्टा फिरवत संपूर्ण मुंबई क्षेत्रातील गाडय़ांचं नियंत्रण करत असतात..

प्रसंग पहिला – संध्याकाळी ६.३० वाजता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटणारी गाडी बरोबर ६.३० वाजता प्लॅटफॉर्ममधून निघते आणि बाहेर येऊन मशीद बंदरच्या आधी थांबते. गाडीतले लोक मोटरमनचा उद्धार सुरू करतात..

प्रसंग दुसरा – अचानक पळणारी गाडी दोन स्थानकांच्या मध्ये थांबते. प्रवाशांना कारण कळत नाही. त्यांना कोणी सांगतही नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मोटरमनचा उद्धार सुरू होतो. रेल्वेच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली जाते..

प्रसंग तिसरा – चर्चगेट किंवा सीएसटी स्थानक येण्याआधी गाडी थांबून राहते. बाजूने एक लोकल किंवा मेल-एक्स्प्रेस गाडी जाते आणि मगच आपली गाडी हलते. आपली गाडी गेल्यानंतर ही गाडी पुढे काढता येत नाही का, अशी चर्चा प्रवाशांमध्ये रंगते आणि पुन्हा एकदा मोटरमनची आठवण काढली जाते..

हे तीनही प्रसंग मुंबईकरांच्या आयुष्यात जवळपास रोजच घडणारे. तीनही प्रसंगांच्या अंती मोटरमनचाच उद्धार होतो. पण प्रत्यक्षात गाडी पुढे न्यायची की नाही, याचा निर्णय मोटरमन करत नसतोच. तो निर्णय, किंबहुना सीएसटी ते कसारा, खोपोली, पनवेल किंवा चर्चगेट ते विरार-डहाणू इथपर्यंत धावणाऱ्या प्रत्येक गाडीबाबतचा निर्णय हा पश्चिम आणि मध्य रेल्वेवर एका स्थानकावर असलेल्या ट्रेन मॉनिटिरग सिस्टीम म्हणजेच टीएमएस रूमधून घेतला जातो. तो निर्णय घेणारी व्यक्ती असते कंट्रोलर! मुंबईतील रेल्वेच्या छोटय़ातल्या छोटय़ा हालचालीचा दिग्दर्शक!

काही दिवसांपूर्वी आपण रेल्वेची सिग्नल यंत्रणा समजून घेतली होती. ट्रॅक सíकट, त्याला जोडलेले डिजिटल एक्सेल काऊंटर, त्यातून कंट्रोल टॉवरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लहरी, या सगळ्यांचा परिचय त्या वेळी झाला होता. ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीम ही त्याच प्रणालीची पुढली आणि अतिप्रचंड पायरी आहे.

रेल्वेवर जिथे जिथे रुळांचं इंटरसेक्शन किंवा क्रॉसिंग असतं, तिथे रेल्वेची सिग्नल यंत्रणा किचकट असते. म्हणजे मुंबई सेंट्रलहून एखादी लांबपल्ल्याची गाडी सुटत असते. त्या वेळी डाऊन जलद मार्गावर विरारकडे जाणारी जलद लोकलही येऊन थांबते. या लोकलच्या पुढली लोकल तोपर्यंत दादरला पोहोचत आलेली असते. म्हणजे तांत्रिकदृष्टय़ा या जलद लोकलला हिरवा सिग्नल असणे अपेक्षित असते. पण ही लांबपल्ल्याची गाडी येणार असल्याने क्रॉसओव्हर पॉइंट किंवा रूळ दुभाजक असलेल्या जागेच्या आधीचा सिग्नल लाल होतो. लांबपल्ल्याची गाडी पुढे गेल्यानंतर ठरावीक अंतराने हा सिग्नल पुन्हा पिवळा, दोन पिवळे आणि हिरवा होतो. ही प्रणाली स्वयंचलित असली, तरी ज्या ज्या ठिकाणी रूळ दुभाजक असतील, त्या स्थानकाजवळ एक कंट्रोल रूम असते. त्याला रूट रिले इंटरलॉकिंग केबिन (आरआरआय) म्हणतात. तिथे स्टेशन अधीक्षक दर्जाचा माणूस बसलेला असतो. त्या माणसाच्या समोर असलेल्या टेबलावर त्या स्थानकाच्या आसपासचा सर्व नकाशा जसाच्या तसा असतो. म्हणजे त्याच्या सेक्शनमध्ये असलेल्या रेल्वे माíगका, रूळ दुभाजक पॉइंट, सिग्नल, याचं एक छोटं दृश्यस्वरूप त्या टेबलावर असतं.

आता मघाचंच उदाहरण पाहू. लांबपल्ल्याची गाडी मुख्य मार्गावर आल्यानंतर या केबिनमध्ये बसलेला कंट्रोलर वेळ न दवडता त्याच्या समोरील टेबलावरील एक कळ दाबून मागे अडकलेल्या लोकल ट्रेनला सिग्नल देतो. विशेष म्हणजे अशा अनेक आरआरआय केबिन मध्य व पश्चिम रेल्वेवर ठिकठिकाणी आहेत. या सर्व केबिनची माहिती टीएमएस प्रणालीकडे जात असते. मध्य तसेच पश्चिम रेल्वेवरील एका स्थानकाजवळ (सुरक्षेच्या कारणास्तव या स्थानकांची नावे प्रसिद्ध करता येत नाहीत) असलेल्या या टीएमएस कक्षामध्ये संपूर्ण िभत भरेल एवढय़ा एलईडी स्क्रीन्स लावल्या असतात. त्या स्क्रीन्सवर चर्चगेटपासून विरार-डहाणूपर्यंत किंवा सीएसटीपासून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या हद्दीपर्यंत सगळ्या गोष्टी दिसत असतात. या स्क्रीनही सेक्शनमध्ये विभागलेल्या असतात. प्रत्येक सेक्शनची देखरेख करण्यासाठी स्वतंत्र कंट्रोलर त्यांच्या समोर या स्क्रीन दाखवणारे संगणक घेऊन बसलेले असतात. सीएसटीहून खोपोलीकडे निघालेली लोकल जसजशी पुढे सरकत जाते, तसतशी ती या कंट्रोल रूममध्ये बसून बघता येते.

कंट्रोलरचे महत्त्व काय?

आता जरा विचार करा, अंधेरी ते बोरिवली यांदरम्यान गाडी सुसाट जात असते. एवढय़ात जोगेश्वरी-गोरेगाव यांच्यामध्ये अचानक गाडी थांबते. कोणीतरी रूळ ओलांडताना गाडीखाली येऊन मेलेलं असतं. अशा वेळी मोटरमन गार्डला त्याबाबत माहिती देतो आणि गार्ड उतरून संपूर्ण गाडीच्या खाली बघत येतो. टीएमएस कक्षातल्या स्क्रीनवर बोरिवली-८९ (ही रेल्वेची परिभाषा आहे. रेल्वेमध्ये प्रत्येक फेरीला विशिष्ट क्रमांक असतात.) जोगेश्वरी आणि गोरेगावच्या मध्ये थांबलेली दिसते. त्याचबरोबर मागून येणाऱ्या विरार-५४, बोरिवली-९१ यादेखील त्या गाडीच्या मागे अडकणार असल्याचे दिसते. अशा वेळी कंट्रोलर जवळच्या आरआरआय केबिनशी संपर्क साधतो. तेथून गाडीच्या गार्डपर्यंत संदेश जातो. ही गाडी लवकरात लवकर पुढे काढा, वक्तशीरपणा बोंबलत आहे, असे कंट्रोलर फोनवरून सतत सांगत असतो. कोणतीही गाडी कुठेही थांबवण्याची, कोणत्याही गाडीला दुसऱ्या गाडीच्या पुढे काढण्याची, काहीही समस्या आली, तरी अडकलेली गाडी पुढे नेण्याची जबाबदारी आणि ताकद या कंट्रोलरच्या हाती असते.

तांत्रिक बिघाडाच्या वेळी..

एखाद्या गाडीत तांत्रिक बिघाड झाला की, ती गाडी एखाद्या सेक्शनमध्ये अडकून पडते. जवळच्या स्थानकातील रेल्वे कर्मचारी व अधिकारी तो बिघाड दूर करण्यासाठी लगेच धाव घेतात. पण त्या गाडीच्या मागच्या गाडय़ाही अडकून पडू नयेत, यासाठी कंट्रोलर मग त्या गाडय़ा दुसऱ्या मार्गावरून पुढे काढण्याच्या सूचना आरआरआय केबिनमधल्या लोकांना देतो. त्याच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे काम या लोकांना करावे लागते. गर्दीच्या वेळी तर कंट्रोलरच्या जागी काम करणाऱ्या माणसाला तीन-तीन तास जागेवरून हलणे शक्य नसते. सतत त्या-त्या सेक्शनमधल्या आरआरआय केबिनच्या संपर्कात राहणे, गाडीचा पाथ क्लीअर करणे, डेक्कन क्वीन, राजधानी अशा प्रतिष्ठेच्या गाडय़ांना प्राधान्य देणे, या गोष्टी त्याला पाहाव्या लागतात.

‘दिल चाहता है’ हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. त्यात ऑपेराचा एक प्रसंग आहे. तो ऑपेरा कंडक्ट करणारा एक कंडक्टर असतो. कोणते वाद्य कुठल्या वेळी आणि किती तीव्रतेने वाजले पाहिजे, हे तो खाणाखुणा करून सांगत असतो. कोणताही वादक त्या कंडक्टरच्या आज्ञेबाहेर जात नाही. कंट्रोलर हा मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसेवा नावाच्या ऑपेराचा कंडक्टर आहे.

रोहन टिल्लू

@rohantillu

(गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार.. वाचा पुढील भागात.)

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-10-2016 at 03:33 IST
ताज्या बातम्या