प्रवासी संख्या वाढवण्यासाठी मध्य रेल्वेचे नियोजन

मुंबई : कार्यालयीन वेळेत प्रवाशांकरिता डोकेदुखी ठरणारी आणि प्रतिसादासाअभावी प्रवाशांच्या प्रतीक्षेत असलेली ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल आता शनिवार-रविवारी, सुट्टीच्या दिवाशीही चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.

३० जानेवारीला पनवेल ते ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकलला मोठय़ा उत्साहात हिरवा कंदील दाखवला गेला असला तरी प्रवाशांकडून या गाडीला थंड प्रतिसाद आहे. सध्या वातानुकूलित लोकलने सरासरी केवळ ८० ते ९० प्रवासी (प्रत्येक फेरी) प्रवास करतात. मात्र वातानुकूलित लोकलमुळे सामान्य लोकलच्या १६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. फेऱ्या कमी झाल्याने शेकडो प्रवाशी नाराज आहेत. परंतु वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या कमी झालेल्या नाहीत. दुसरीकडे या गाडीला अद्यापही प्रवाशांची प्रतीक्षा आहे. आता वातानुकूलित गाडीला प्रतिसाद वाढवण्यासाठी ती शनिवार आणि रविवारीही चालवण्याचे नियोजन मध्य रेल्वे करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सेवेत असलेली लोकल सोमवार ते शुक्रवापर्यंतच धावते. अन्य दोन दिवशी वातानुकूलित लोकलची देखभाल-दुरुस्ती केली जाते. मात्र दुसरी वातानुकूलित लोकल सेवेत आल्यामुळे आता शनिवार-रविवारही वातानुकूलित लोकल सेवा देणे शक्य आहे. त्यामुळे देखभाल-दुरुस्तीचाही प्रश्न सुटणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रविवारी हार्बरवर मेगाब्लॉक असतो. तर कधी तरी ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉकही घेतला जातो. ज्यावेळी ब्लॉक असेल त्यावेळी लोकल धावणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रविवारी ब्लॉक नसल्यास प्रवाशांची संख्या पाहता त्या दिवशी संपूर्ण १६ फेऱ्या चालवणे योग्य आहे का याचाही विचार केला जात आहे. लवकरच यावर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दोन वातानुकूलित लोकल ताफ्यात असून आणखी चार लोकलही टप्प्याटप्प्यात येत्या काही महिन्यांत येतील. या लोकल सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते कल्याण मार्गावर धावणार आहेत.