मुंबई : ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे. पर्यावरणपूरक नव्या मुंबईची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बदल यशस्वी होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
‘वातावरण फाउंडेशन’ आणि ‘क्लायमेट रिसर्च कन्सल्टन्सी’ यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हाजर्स ’ आणि ‘सस्टेनेबल मोबिलिटी नेटवर्क’ यांच्या सहकार्याने ‘व्हिल्स ऑफ चेंज: मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये ईव्हीच्या स्वीकार्यतेबाबतची भूमिका समजून घेणे’ हा अहवाल तयार करण्यात आला आहे. जागतिक ईव्ही दिनाचे औचित्य साधून मंगळवारी प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. या कार्यक्रमाला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव डॉ. अविनाश ढाकणे, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यात कार्यरत असलेल्या रिक्षा व टॅक्सी चालकांच्या प्रश्नांच्या महत्त्वपूर्ण नोंदी आणि शिफारशी या अभ्यासातून समोर आल्या आहेत. वित्तीय सहाय्य आणि चार्जिंगविषयक चिंता योग्य असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध आहोत. संपूर्ण राज्यात ईव्ही चार्जिंगचे जाळे वेगाने विणले जात आहे. सर्व भागधारकांसोबत वित्तपुरवठ्याबाबतच्या नवीन शिफारशींच्या पर्यायांचा तत्परतेने विचार करण्यात येईल. प्रदूषणविरहीत वाहतूक व्यवस्थेकडे जाण्याचे ध्येय मोठे असले तरी ते सर्वसमावेशक असले पाहिजे. सर्वजण एकत्रितपणे मुंबई शहरासाठी निरोगी आणि अधिक सक्षम भविष्याची निर्मिती करू, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
राज्य सरकारने विद्युत वाहन धोरणाअंतर्गत मुंबईसह राज्याला हरित वाहतुकीचे केंद्र बनवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. या उपक्रमात ऑटो व टॅक्सी चालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विद्युत वाहने ही केवळ पर्यावरणपूरक वाहतूक साधने नसून सार्वजनिक वाहन चालकांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे साधन आहेत. इंधन दरातील चढ-उतारांपासून मुक्ती आणि अधिक उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे हे ई-वाहनांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. भविष्यात स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे सरनाईक म्हणाले.
मुंबईची हवा शुद्ध ठेवण्यासाठी आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी ऑटो-रिक्षा आणि टॅक्सीचे विजेवर चालणाऱ्या वाहनांमध्ये संक्रमण घडवून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलू शकतो. असे अभ्यास धोरण अधिक अचूकपणे आखण्यासाठी, योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी आणि मुंबईला प्रदूषणविरहीत, भविष्यातील अधिक समावेशक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने वाटचाल करण्यास चालना देते, असे विवेक भीमनवार यांनी यावेळी सांगितले.