लोकल ट्रेनच्या मोटर कोचला लटकून प्रवास करताना १८ वर्षीय तरुण हात सटकून खाली पडला. एका मेल एक्सप्रेसच्या प्रवाशाने मोबाईलमध्ये ही थरारक घटना चित्रित केली आहे. दरम्यान जखमी तरुणाला कळव्यातील जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून, सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिश जकिर हुसैन खान हा १८ वर्षीय तरुण कळव्यामध्ये राहतो. तो २३ जूनला सकाळी साडेनऊ वाजता कळवा ते दादर असा प्रवास लोकलच्या मोटरकोच डब्याला लटकून करत होता. त्याच्यासह आणखी दोन प्रवासीही लटकत होते. प्रवासादरम्यान दानिशचा हात सटकला आणि तो रुळाच्या बाजूला पडला. ही सर्व घटना बाजूनेच जाणाऱ्या एका एक्सप्रेसमधील प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केली.

या घटनेत दोन अनोळखी इसमांनी घटनास्थळी धाव घेऊन दानिशला त्वरित रुग्णालयात दाखल केले. तरुणाच्या पायाला आणि हाताला जबर मार लागला आहे. हा अपघात स्वतःच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे जखमी प्रवाशाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लोकल’ मधून पडून होणाऱ्या अपघातात वाढ –

लोहमार्ग पोलिसांच्या नोंदीनुसार लोकलमधून पडून तसेच रुळाजवळील खांबाला धडकल्याने झालेल्या अपघातात वाढ झाली आहे. २०२० मध्ये लोकलमधून पडून १७७ जणांचा, तर रुळाजवळील खांब लागल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर २०२१ मध्ये २७७ जणांचा मृत्यू आणि रुळाजवळील खांबाला आदळून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.