बांधकाम आणि पर्यावरण हे अनेकदा एकमेकांच्या विरोधात जाताना दिसतात आणि त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि पर्यावरणतज्ज्ञ हेदेखील एकमेकांशी फटकून वागताना दिसतात. पालिकेचे निर्णय, मग ते बांधकामाबाबत असो नाही तर झाडांबाबत, त्याचा पर्यावरणाला तोटाच होतो यावर बहुतांश पर्यावरणप्रेमींचे एकमत होईल आणि त्यात फारसे चुकीचेही काही नाही.

शहरातील झाडे जपण्यासाठी निर्माण केलेल्या वृक्षसमितीकडूनच झाडांची सर्वाधिक कत्तल होते आणि तीही कायदेशीरपणे या आरोपात तथ्य नाही असे कसे म्हणता येईल? पण मुंबई महानगरपालिकेने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयाने मात्र वृक्षप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत त्याही चक्कसुखद आश्चर्याने! पावसाळ्यात दरवर्षी पालिका एक लाख झाडे लावते (पावसाळ्यानंतर ती कुठे जातात ते पालिकेलाही आजतागायत निश्चितपणे सांगता आलेले नाही, पण तूर्तास ते बाजूला ठेवू ). यावर्षीही तसा संकल्प केला गेला आहे. या संकल्पात नवीन काहीच नाही. नावीन्य आहे ते झाडे निवडण्यात. स्थानिक किंवा देशी झाडे लावण्यासाठी आणि लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. एवढी वष्रे वृक्षतज्ज्ञ करीत असलेली मागणी अखेर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या गळी उतरली. अर्थातच विदेशी झाडांना विरोध करण्यामागे मतांचे राजकारण नक्कीच नाही.

Bee attack on wrestling ground near Patan karad
पाटणजवळ कुस्ती मैदानावर मधमाशांचा हल्लाबोल; पहिलवानांसह १५ जण जखमी
E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना

काहींना देशी झाडे म्हणजे नेमकी कोणती, असा प्रश्न पडला असेल आणि त्यात वावगे काही नाही. कारण ‘कॉस्मोपोलिटन’ असलेल्या या महानगरात कोण मूळचे आणि कोण बाहेरचे याबाबत नेहमीच गोंधळाचे वातावरण असते. झाडांबाबतही तसे होऊ शकते. तुम्हाला नवल वाटेल पण मुंबईचा रस्ता व्यापून टाकणारी बहुतांश झाडे विदेशी आहेत. पिवळ्या रंगांच्या फुलांचा सडा पडणारा सोनमोहोर आणि कीड लागल्याने मरणपंथाला लागलेले भलेमोठे पर्जन्य वृक्ष (रेन ट्री) ही झाडेही भारतीय नाहीत. अगदी सगळ्यांचा आवडता आणि अनेक कवींचा लाडका गुलमोहोरही विदेशीच.. या झाडांच्या सौंदर्याबाबत काहीच वाद नाही. त्यातच ती विदेशी म्हटल्यावर आपल्याला त्यांचे अधिक कौतुकही वाटणार. पण कौतुकही किती करावे. २००८ मध्ये केल्या गेलेल्या वृक्षगणनेनुसार मुंबईत ३६४ प्रकारची १९ लाख १७ हजार झाडे होती. त्यात सर्वाधिक संख्या असलेल्या पहिल्या २० प्रकारांतील सहा झाडे विदेशी आहेत. सुबाभूळ, सोनमोहोर, देशी बदाम, गुलमोहोर, पर्जन्य वृक्ष आणि बॉटल पाम या सहा झाडांची संख्या ४ लाख ८ हजार होती. म्हणजेच एकूण झाडांच्या सुमारे २० टक्के.

४०-५० वर्षांपूर्वी शहरांच्या रस्त्यावर ही झाडे लावताना ‘मेड इन फॉरेन’ हा शिक्का महत्त्वाचाच ठरला असणार. पण माणसांना जी अक्कल आहे ती बिच्चाऱ्या पशू-पक्ष्यांना कुठून येणार? त्यांना ‘फॉरेन’च्या झाडांचे मोल ते काय? ती या झाडांशी ‘फटकून’च राहतात. आज ५० वर्षांनंतर कावळ्याखेरीज (तो पक्का मुंबईकर आहे. वाट्टेल त्या स्थितीशी जुळवून घेतो) इतर कोणत्याही पक्ष्याने या झाडांवर घरटे केलेले दिसत नाही. वृक्षांवरील फुले-फळे यावर पक्षी अवलंबून असतात. मात्र या झाडांकडे सावली वगळता पक्ष्यांना आकर्षित करण्यासारखे काहीच नाही. वृक्ष ही एक परिसंस्था आहे. त्यात पक्षी हे एक घटक. त्यांच्यासोबत फुलपाखरे, विविध प्रकारचे किडे, अतिसूक्ष्म जिवाणू, परजीवी वेली हे या परिसंस्थेचा भाग असतात. एवढय़ा वर्षांत या झाडांवर परिसंस्था विकसित झालेली नाही. आपले वातावरण झाडांसाठी अतिशय पोषक आहे. त्यामुळेच इथे झाडांच्या शेकडो जाती दिसतात. पाणी आणि दमट हवा बहुतांश वृक्षांना मानवते. म्हणूनच विदेशी वातावरणातील झाडांनीही इथे चांगलेच मूळ धरले. पण अतिउत्साहात स्थानिक झाडे बाजूला पडली. द्राक्षाच्या घोसाप्रमाणे लगडलेल्या सोनेरी पिवळ्या रंगाच्या फुलांनी झगमगून उठणारा बहावाही मागे राहावा एवढे या विदेशी झाडांचे माहात्म्य नक्कीच नाही.

हे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना पटवून देण्याचे प्रयत्न गेले अनेक वर्षे सुरू आहेत. मात्र कोटय़वधी रुपयांच्या कंत्राटांच्या जंजाळात अडकलेल्या अधिकाऱ्यांना असे सोपे आणि निधीची आवश्यकता नसलेले निर्णय घेण्यास वेळ लागणारच. तर आता अनेक वर्षांनी पालिकेने स्थानिक झाडांना प्राध्यान्य देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वृक्षप्रेमींच्या भुवया उंचावणे साहजिकच म्हणायला हवे. या पावसाळ्यात ही झाडे शहरात लावली जाणार आहेत आणि ज्यांना सोसायटीच्या आवारात झाडे लावायची आहेत त्यांना वॉर्ड कार्यालयात ती सवलतीच्या दरात उपलब्धही होतील.

इथे थोडी काळजी घेणे मात्र आवश्यक आहे. रस्त्याच्या बाजूला झाडे लावताना त्याचा पादचाऱ्यांना, वाहतुकीला अडथळा येणार नाही, झाड मजबूत असेल, पावसाळ्यात फांद्या तुटून इजा होणार नाही, खूप फळे खाली पडून चिखल होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. बहावा, तामण, करंज, नागचाफा, सातवीण, बकुळ, समुद्रफूल, पुत्रंजीव, कडुिनब, उंबर, कदंब, िपपळ, वावळ, शिसव, बेहडा, कांचन, वटवृक्ष यांसारखी झाडे लावता येतील. तेव्हा या पावसाळ्यात ‘मेड इन इंडिया’ झाडे लावण्याची सुरुवात करू या आणि पालिका झाडांच्याबाबत यापुढेही पर्यावरणप्रेमींना दुखावणार नाही अशी वेडी आशा धरू या.

prajakta.kasale@expressindia.com