मुंबई : विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल मागील काही वर्षांमध्ये वाढत आहे. तीन वर्षांत विधि महाविद्यालयांची संख्या १६२ वरून २१८ झालेली असताना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १८ हजारांवरून २३ हजारांवर पोहचली आहे. यंदा विधि तीन वर्षे अभ्यासक्रमाला २२ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असला तरी केंद्रीभूत प्रवेश फेरीअंतर्गत उपलब्ध सर्व १९ हजार ८९५ जागांवर प्रवेश झाले आहेत.

चांगले उत्पन्न, प्रतिष्ठा व कायद्याचे ज्ञान यांमुळे मागील काही वर्षांपासून वकील होण्याकडे विद्यार्थी व अनेक नोकरदार वर्गांचा कल वाढला आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांमध्ये विधि अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या महाविद्यालयांमध्ये वाढ झाली असली तरी सलग तीन वर्ष ९६ टक्क्यांपेक्षा अधिक जागांवर प्रवेश होत आहेत. राज्यात २०२३-२४ मध्ये १६२ महाविद्यालयांमध्ये १९ हजार ३४१ जागा होत्या. त्यातील १८ हजार ७४८ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले तर फक्त ५९३ जागा रिक्त राहिल्या.

२०२४-२५ मध्ये पाच महाविद्यालये वाढल्याने उपलब्ध जागांची संख्या २१ हजार ७१ वर पोहचली. यावर्षीही २० हजार ३७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर फक्त ६९७ जागा रिक्त राहिल्या. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांमध्ये विधि महाविद्यालयांच्या संख्येत तब्बल ५१ नवीन महाविद्यालयांची भर पडली प्रवेशासाठी २३ हजार ८५९ जागा उपलब्ध झाल्या. मात्र यंदाही २२ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी विधि अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला तर ९४२ जागा रिक्त राहिल्या. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक जागा रिक्त राहिल्या असल्या तरी वाढलेल्या जागांच्या तुलनेत हे प्रमाण फक्त तीन टक्के इतकेच असून, प्रवेश घेण्यामध्ये विद्यार्थ्यांनी उच्चांक गाठला आहे.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील सर्व जागांवर प्रवेश

राज्यातील २१८ विधी महाविद्यालयांमध्ये यंदा २३ हजार ८५९ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यातील केंद्रीभूत प्रवेश फेरी, संस्थात्मक फेरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (इडब्ल्यूएस) जागांचा समावेश होता. त्यामध्ये २२ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, यामध्ये १४ हजार ८४६ मुले व ८ हजार ७१ मुली आहेत. यामध्ये केंद्रीभूत प्रवेश फेरीअंतर्गत १०० टक्के प्रवेश झाले. या फेरीसाठी १९ हजार ८९५ जागा उपलब्ध होत्या. त्याचबरोबर इडब्ल्यूएस प्रवर्गासाठी असलेल्या १ हजार ६७८ जागांपैकी ८१८ जागांवर प्रवेश झाले, तर ८६० जागा रिक्त राहिल्या. संस्थात्मक फेरीसाठी असलेल्या २ हजार २०५ जागांपैकी २ हजार २०४ जागांवर प्रवेश झाले असून फक्त १ जागा रिक्त राहिली आहे.

मागील काही वर्षापासून विधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ९६ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. यावर्षी प्रवेशाच्या चार फेऱ्या झाल्या व ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली. – दिलीप सरदेसाई, आयुक्त, राज्य सीईटी कक्ष