मुंबई : राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषेच्या समावेशाची सक्ती केल्यानंतर राज्यभरातून त्याला तीव्र विरोध झाला. यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्र समिती नेमून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार हा अहवाल येत्या २० डिसेंबर रोजी सरकारला सादर केला जाणार असल्याची माहिती त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी सोमवारी दिली. डॉ. जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
राज्यातील भाषिक धोरणाविषयी जनमत समजून घेण्यासाठी आणि त्रिभाषा सूत्र समितीच्या शिफारशींबाबत डॉ. जाधव विविध नेत्यांशी संवाद साधत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची सोमवारी वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या वेळी उपस्थित होते. या वेळी शैक्षणिक विषयांसह हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सविस्तर सुसंवाद झाला. भेटीनंतर राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती लादू नका, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली.
जनमतानंतरच भूमिका
भाषा समितीच्या अंतिम अहवालाची तयारी सुरू असून विविध राज्यांतून मिळालेल्या प्रतिक्रिया त्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. बुधवारी नाशिक आणि गुरुवारी पुणे येथे जनमत जाणून घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. लोकांचे प्रश्न, समस्या आणि भाषा संदर्भात मत जाणून घेण्यात येतील. त्यानंतरच भाषेबाबत भूमिका जाहीर केली जाईल, असा निर्वाळा उद्धव ठाकरे यांना दिल्याचे डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले.
