नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीनही प्रांतामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सुलभा देशपांडे म्हटलं की आठवते ती नैसर्गिक आणि वास्तवदर्शी अभिनयशैली. सहजपणा आणि सोपेपणा जो तिच्या वागण्यामध्ये होता तोच अभिनयामध्येही होता. खरं तर, त्या मला खूप वरिष्ठ असल्या तरी आमच्यामध्ये जवळीक एवढी होती की मी तिला सुलभाताई म्हणूनच हाक मारे.
मराठी रंगभूमीइतकेच सुलभाने सत्यदेव दुबे यांच्या नाटकांतून भूमिका करून हिंदूी रंगभूमीवरही योगदान दिले आहे. प्रायोगिक नाटय़ चळवळीमध्ये दबदबा असलेल्या रंगायन संस्थेमध्ये विजय तेंडुलकर, डॉ. श्रीराम लागू, माधव वाटवे, अरिवद देशपांडे, सुलभा देशपांडे, श्री. पु. भागवत आणि विजया मेहता असे जबरदस्त रंगकर्मी होती. ‘रंगायन’चे ‘लोभ असावा ही विनंती’ हे माझे पहिले नाटक. रंगायन संस्थेतूनच पुढे आविष्कार संस्था जन्माला आली. त्यामध्ये तेंडुलकर, अरुण काकडे, विजयाबाई, अरिवद आणि सुलभा होते. छबिलदास चळवळीमध्ये आणि ‘चंद्रशाला’ संस्थेच्या माध्यमातून बालनाटय़चळवळीमध्येही सुलभाने तेवढेच योगदान दिले. सुलभाने दिग्दर्शित केलेल्या ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकामध्ये ७० मुले काम करायची. या नाटकाचे भारतातच नाही तर, परदेशातही प्रयोग झाले आहेत. मराठी आणि हिंदूीमध्ये मुख्य धारेतील चित्रपटांबरोबरच समांतर चित्रपटांमध्येही तिच्या भूमिका गाजल्या. स्मिता, शबाना ते श्रीदेवी आणि रेखा अशा सर्व अभिनेत्रींची पडद्यावरची आई झाली. रत्नाकर मतकरी यांचा ‘इन्व्हेस्टमेंट’मधील तिची भूमिका मला आवडली होती.
‘चौकट राजा’मध्ये मी आधी स्मिता तळवलकर हिच्या नवऱ्याची भूमिका करणार होतो. तर, नंदू ही व्यक्तिरेखा परेश रावळ साकारणार होता. पण, ते झाले नाही. तेव्हा चित्रीकरणाआधी दोन दिवस मला कोल्हापूरला बोलावून घेण्यात आले. ही भूमिका दिलीपच करू शकेल असे सुलभाने स्मिता आणि संजय सूरकर यांच्या गळी उतरवले होते. सुलभाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि पूर्वी एकत्र काम केल्याने नवखेपणा नसण्याचा फायदा मला झाला आणि आयत्या वेळेला येऊनही ही भूमिका मी करू शकलो. मतिमंद नंदू खोडय़ांमुळे आईच्या हातचा मार खातो हे दृश्य सुलभाताई मला लागेल म्हणून व्यवस्थित मारेचना. अखेर ‘जोरात मार’, असे संजयला सांगावे लागले आणि चौथ्या टेकमध्ये चित्रीकरण पूर्ण झाले. तिची मला मारताना होणारी तगमग पाहिली होती. अंगाई गीत म्हणून मला झोपविण्याच्या दृश्यामध्ये तिने आयत्या वेळी तिच्या बालपणातील गीत म्हटले होते.
या चित्रपटामुळे मतिमंद मुले आणि पालकांशी माझा जो संबंध आला आणि या भूमिकेमुळे मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुलभाताईचे श्रेय कारणीभूत आहे. तिच्यामुळेच या मोठय़ा अनुभवाला मी सामोरा गेलो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चळवळ हीच खरी श्रद्धांजली!
साठ वर्षांचा काळ आम्ही त्यांच्याबरोबर घालवला आहे. त्यांच्याबरोबर आम्ही नाटय़चळवळ उभारली. आजही ती खंबीरपणे उभी आहे आणि यापुढेही ती तशीच सुरू राहील, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. बालरंगभूमीसाठी त्यांनी जी चळवळ उभी केली ती खऱ्या अर्थाने खूप महत्वाची होती. आज त्याच नाटकांमधून काम केलेली मुले मोठी झाली आहेत. कलाकार म्हणून मानाने वावरत आहेत, हे खूप मोठे यश आहे.
सुलभाताई कलाकार म्हणून खूप मोठय़ा होत्या. कलाकाराने कसे असले पाहिजे याचा त्या आदर्श होत्या. वयोमानामुळे त्यांना गुडघेदुखीचा त्रास जाणवू लागला तेव्हा त्यांनी स्वत:हून रंगभूमीवर काम करणे थांबवले. आता मला रंगभूमीवर तासन्तास उभे राहणे शक्य होणार नाही हे मान्य करत त्यांनी काम थांबवले. पण अभिनय थांबवला नाही. त्यासाठी त्यांनी माध्यमांतर के ले.
चळवळीचे आयुष्य चढउताराचे असते. प्रायोगिक नाटकांसाठी जागा नव्हती तेव्हा ताई छबिलदासमध्ये शिक्षिका होत्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आम्हाला चळवळीसाठी छबिलदासची जागा मिळाली. दुर्दैवाने तिथून आम्हाला हाकलून लावले. तरीही न डगमगता सुलभाताईंनी माहीमच्या पालिका शाळेत चळवळीचे बस्तान बसवले. आता तिथूनही जागा खाली करण्याची नोटीस आल्याने त्या चिंतेत होत्या. मात्र काहीही झाले तरी ही नाटय़चळवळ पुढे सुरू राहील. ल्ल अरुण काकडे

– दिलीप प्रभावळकर 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tributes to sulabha deshpande
First published on: 05-06-2016 at 02:49 IST