मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल टीबरक्युलॉसीस अहवाल २०२५ नुसार भारतात क्षयरोगाच्या (टीबी) घटनांमध्ये गेल्या नऊ वर्षांत २१ टक्के घट नोंदली असली तरी देश अजूनही जगातील सर्वाधिक टीबी भार असलेल्या देशांपैकी एक आहे. २०२४ मध्ये जगभरातील एकूण नवीन टीबी रुग्णांपैकी तब्बल २५ टक्के रुग्ण भारतातील असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे औषध प्रतिरोधक क्षयरुग्णांची वाढ हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यातही महाराष्ट्रात औषध प्रतिरोधक क्षयरुग्णांची वाढती संख्या हा काळजीचा विषय बनला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
देशात टीबी रुग्णांची संख्या २०१५ मध्ये प्रति लाख लोकसंख्येत २३७ होती ती २०२४ मध्ये प्रति लाखांमागे १८७ एवढी कमी झाली आहे. मृत्यूदरातही काही प्रमाणात सुधारणा झाली असून २०१५ मधील प्रति लाख लोकांमागे २८ एवढी होती की कमी होऊन २१ प्रति लाखांवर आला आहे. निदान क्षमता, डिजिटल एक्स-रे, मॉलिक्युलर चाचण्या आणि ‘निक्षय’ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपचारांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे.
तथापि, केंद्र सरकारने ठरविलेले ‘टीबी-मुक्त भारत २०२५’ हे लक्ष्य अद्याप दूर असल्याचे अहवाल स्पष्ट करतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या एंड टीबी धोरणानुसार २०२५ पर्यंत घटनांमध्ये ५० टक्के घट आणि मृत्यूदरात ७५ टक्के घट व्हायला हवी होती. परंतु देश त्या गतीने पुढे सरकू शकलेला नाही. सामाजिक-आर्थिक असमानता, पोषणाची कमतरता, शहरी झोपडपट्ट्यांतील राहणीमान आणि औषध-प्रतिरोधक टीबी (एमडीआर टीबी) ही सर्वात मोठी आव्हाने ठरत आहेत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात २०२४ मध्ये २.३ लाख नवीन टीबी रुग्ण आढळले. यापैकी १० हजारांहून अधिक रुग्ण औषध-प्रतिरोधक (डीआर टीबी) असून हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याची नोंद आहे. राज्यात २०२५ च्या पहिल्या दोन महिन्यांतच सुमारे ४० हजार नवीन प्रकरणे आढळल्याने आरोग्य यंत्रणेत चिंता वाढली आहे.
ग्रामीण भाग, मुंबई-पुणे महानगर क्षेत्र आणि आदिवासी जिल्ह्यांमध्ये टीबीच्या वाढत्या घटनांकडे विशेष लक्ष देत राज्य सरकारने ‘१०० दिवसात क्षयरोग निर्मूलन कॅम्पेन’ सुरू केली होते. यामध्ये संशयित रुग्णांचे एक्स-रे स्क्रिनिंग, घराघर तपासणी, तसेच उपचारात खंड पडू नये म्हणून पोषण सहाय्य आणि ‘निक्षय मित्र’ उपक्रमाद्वारे सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींचा सहभाग वाढविण्यात येत आहे.राज्यात ८० हून अधिक हँड-हेल्ड डिजिटल एक्स-रे मशीन जिल्ह्यांना देण्यात आल्याने दुर्गम भागात निदानाची गती वाढली आहे. तरीही डीआर टीबी आणि उपचार सोडून देणाऱ्या रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात आणणे हे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.
भारत आणि महाराष्ट्रात क्षयरोग नियंत्रणात प्रगती करत असले तरी २०२५ पर्यंत टीबी निर्मूलनाचे लक्ष्य गाठण्यासाठी अजून अधिक वेगाने आणि सातत्याने काम करण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेने अधोरेखित केली आहे.आरोग्य सुविधा वाढविण्याबरोबरच पोषण, राहणीमान, जनजागृती, औषध-प्रतिरोधक टीबीवरील विशेष मोहीम आणि दीर्घकालीन धोरणांची शाश्वत अंमलबजावणी ही पुढील काही वर्षांत निर्णायक ठरणार आहेत. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बहुतेक क्षयरुग्ण हे सुरुवातीला औषध घेण्यात जो उत्साह दाखवतात तो थोडे बरे वाटू लागताच औषध घेण्यात त्यांचा खंड पडतो. तसेच यंत्रणेकडूनही यासाठी योग्य पाठपुरावा केला जात नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुदलात महाराष्ट्रात क्षयरोग निर्मलनासाठी पुरेशी आरोग्य यंत्रणा नाही तसेच मनुष्यबळाचा अभावा हेही मुद्दे महत्त्वाचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
