मुंबई : विलेपार्ले येथील एका घरातून चोरीला गेलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या दागिन्यांच्या प्रकरणाचा छडा जुहू पोलिसांनी लावला. याप्रकरणी दोन सराईत चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आता पर्यंत ८० लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीची घटना २८ जून रोजी घडली होती.
तक्रारदार विलेपार्ले पश्चिमेतील गुलमोहर रोडवरील अशोकनगर सोसायटीच्या स्प्रिंगवेल इमारतीत राहतात. त्यांचे कुटुंबिय २३ जून ते ५ जुलै दरम्यान दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तेथून घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे आढळले. फिर्यादीच्या शयनकक्षात दोन कपाटे होती. अज्ञात चोरांनी दोन्ही कपाटांमध्ये ठेवलेले लोखंडी लॉकर उघडून त्यातील २,४६९ ग्रॅम सोने आणि हिरेजडित दागिने, महागडी घड्याळे चोरून नेली होते. या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १ कोटी १५ लाख रुपये होती. आरोपींनी घराच्या खिडकीतून प्रवेश करून ही चोरी केली होती. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(१), ३३१(४) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कॅमेऱ्यातील चित्रणाद्वारे लागला सुगावा
नेमकी चोरी कशी झाली याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. या इमारतीत फक्त एकच सीसी टीव्ही कॅमेरा कार्यरत होता. तो मागच्या बाजूस होता आणि त्याची प्रतिमाही फारशी स्पष्ट नव्हती. मात्र, जुहू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित चव्हाण आणि त्यांच्या पथकाने बारकाईने या सीसी टीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रणाचे निरीक्षण केले. तब्बल १२ दिवसांचे चित्रण (फुटेज) तपासण्यात आले. चोरीची घटना २८ जून रोजी पहाटे २ ते ४.३० दरम्यान झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या चोरीत सनी पवार (२५) आणि राहुल मुदाने (२२) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पूर्वीच्या गुन्ह्यांमुळे दोघेही पोलिसांच्या रडारवर होते. सनी पवार चोरी करून पत्नीसह पंजाबला पळून गेला होता. त्याला १२ जुलै रोजी पंजाबमधील झिरकपूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार मुदाने कोपरखैरणे येथे असल्याचे उघड झाले आणि त्यालाही १३ जुलै रोजी अटक करण्यात आली. पोलिसांनी दोघांकडून सुमारे ८० लाख ६० हजार रुपये किंमतीचे दागिने, चोरीसाठी वापरलेली दुचाकी आणि मोबाइल जप्त केला.
दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार
आरोपी सनी पवार याच्याविरोधात वर्सोवा आणि सांताक्रूझ पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर मुदानेविरोधात वर्सोवा आणि अंधेरीतील अंबोली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
या पोलीस पथकाने केली कारवाई
परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त दिक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सहायक पोलीस निरीक्षक रणजित चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील तसेच अमित महांगडे, नितीन मांडेकर, अर्जुन घाडीगावकर, मंगेश खोमणे, आकाश घोडके, तुषार पन्हाळे, अनिल तायडे, प्रीतम भोसले, हेलकर, तासगावकर आदींच्या पथकाने कारवाई करून या चोरीचा छडा लावला.