समीर कर्णुक, लोकसत्ता

मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘लोकमान्य टिळक टर्मिनस’ परिसरात येत्या पावसाळ्यात दोन लाख झाडे लावण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. तसा प्रस्ताव रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून मियावाकी या जपानमधील आधुनिक पद्धतीनुसार झटपट वाढणारी झाडे येथे लावण्यात येणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे घाणीचे साम्राज्य असल्याने प्रवासी येथून प्रवास करणे टाळत. मात्र गेल्या काही वर्षांत टर्मिनसवर मोठय़ा प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. स्वच्छते बाबतही दक्षता पाळली जाते. ५० ते ६० एकर जागेत उभारलेल्या या टर्मिनसच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात पडीक जागा आहे. त्यामुळे या जागेत विविध प्रकारची झाडे लावल्यास, टर्मिनस अधिक सुंदर दिसेल शिवाय प्रदूषणालादेखील आळा घालता येईल, या उद्देशाने लोकमान्य टिळक टर्मिनसचे मुख्याधिकारी एस. एम. सोनावणे यांनी या जागेवर झाडे लावण्याची संकल्पना रेल्वेसमोर मांडली. रेल्वेकडून हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर  येत्या जुलै महिन्यापासून या कामाला सुरुवात होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कडुनिंब, अशोका, पिंपळ, सोनबवा आणि करंज यांसह काही शोभेची झाडे या ठिकाणी लावली जाणार आहेत. तसेच टर्मिनसच्या बाजूला असलेल्या नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी झाडांना देण्यात येईल. पावसाळ्यात फलाटांवर लावण्यात आलेल्या पत्र्यांवरील पाणी जमा करून या पाण्याचा वापर उन्हाळ्यात या झाडांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी एस. एम. सोनावणे यांनी दिली आहे. यासाठी काही सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे.