मुंबई : जर्मनी येथे सुरू असलेल्या ‘जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा २०२५’मध्ये मुंबई विद्यापीठाचे दोन विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ‘तायक्वांडो’ खेळात शिवम शेट्टी, तर ‘बॅडमिंटन’साठी अलिशा खान भारतीय संघात मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहेत. ही स्पर्धा जर्मनीत २७ जुलैपर्यंत रंगणार आहे.
जर्मनी येथील जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या शिवम शेट्टी आणि अलिशा खान या दोन्ही विद्यार्थ्यांचा खर्च मुंबई विद्यापीठाने केला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विद्यापीठ प्रशासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सदर दोन्ही खेळाडू प्रशिक्षण शिबिरातून जर्मनीला गेले आहेत. विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरु डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मनोज रेड्डी आदींनी अभिनंदन करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, अमृतसर येथील गुरुनानक देव विद्यापीठ येथे पार पडलेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये शिवम शेट्टी याने उकृष्ट कामगिरी करीत ६३ किलो वजनी गटामध्ये भारतीय तायक्वांडो संघात आपले स्थान निश्चित केले. यापूर्वी शिवम शेट्टी यांनी राष्ट्रीय वरिष्ठ गट चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केले, तर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक पटकावले होते.
भुवनेश्वर येथे के. आय. आय.टी. विद्यापीठ येथे पार पडलेल्या बॅडमिंटन निवड चाचणीमध्ये अलिशा खान या विद्यार्थिनीने अप्रतिम कामगिरी करीत महिला दुहेरी भारतीय संघात स्थान निश्चित केले आहे. तसेच आलिशा खान हिने युगांडा आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक आणि इराण फजर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केले होते.