मृत व्यक्तींचे अवयव दान करण्यासाठी अधिकाधिक नातेवाईक पुढे येत असून गेल्या चार दिवसात मुंबईत आणखी दोन व्यक्तींकडून अवयवदान झाले.
कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात १८ मार्च रोजी ६१ वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मूत्रपिंड तसेच यकृत यांचे दान करण्यात आले. हिरानंदानी रुग्णालयात २० मार्च रोजी ६८ वर्षांच्या स्त्रीचे निधन झाले.
दोन्ही मूत्रपिंड व यकृत यांचे दान करण्यासाठी नातेवाईकांनी संमती दिली. जानेवारीपासून आतापर्यंत या वर्षांत १४ जणांकडून मृतवत अवयवदान झाले आहे. जानेवारीमध्ये चार, फेब्रुवारीमध्ये सात तर २२ मार्चपर्यंत तिघांकडून हे अवयवदान झाले. या दात्यांकडून सात हृदय, १५ यकृत आणि २६ मूत्रपिंड यांचे दान झाल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. गेल्यावर्षी ४२ मृत व्यक्तींकडून दान झाले होते. यावेळी ही संख्या ओलांडण्याची शक्यता आहे.