Cyber Crime : देशभरात सायबर फसवणुकीच्या अनेक घटना दररोज घडतात. मागच्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. आयुष्यभर पोटाला चिमटा काढून पै पै जमावलेल्या रकमेवर एका क्षणात सायबर गुन्हेगार दरोडा टाकतात. आता अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. गेल्या महिन्यात दोन वेगवेगळ्या घटनांत ई चलानची बनावट लिंक पाठवून दोन पोलिसांची दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, दोन्ही वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअॅपवरून मिळालेल्या ‘ट्रॅफिक चलन’वर क्लिक केल्यानंतर सायबर फसवणूक करणाऱ्यांनी एकूण १० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या संदर्भात शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी दाखल तक्रारीत म्हटलं की, “राज्यपालांच्या सुरक्षा पथकात काम करणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाने गेल्या आठवड्यात लिंकवर क्लिक केल्यानंतर सुमारे ३ लाख रुपये गमावले.” या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील सायबर फसवणूक करणाऱ्यांकडून आता अशा प्रकारची नवीन पद्धत वापरण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “अशा फसवणुकीच्या प्रकरणात सायबर चोरटे ट्रॅफिक ई-चलनाच्या संदर्भातील लिंक पाठवतात. जे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) आल्याचं लोकांना दिसून येतं. त्यामुळे लोकांना काही संशय येत नाही आणि त्यावर क्लिक करतात किंवा ते डाउनलोड करतात आणि फसतात.”
दरम्यान, ई-चलन सारख्या या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक अॅप असतं आणि त्यानंतर सायबर चोरटे पीडिताच्या मोबाईलचं नियंत्रण घेऊ शकतात. एकदा इन्स्टॉल केल्यानंतर हे अॅप वापरकर्त्याचे डिव्हाइस हायजॅक करू शकते. एवढंच नाही तर ओटीपी सारख्या एसएमएस संदेशांमध्ये प्रवेश मिळवू शकते. तसेच क्रेडिट कार्ड आणि बँकिंग तपशील देखील घेऊ शकतात.
“सायबर फसवणूक करणाऱ्यांनी ई-चलन सारख्या लिंक पाठवल्या तर कोणीही सहजतेने जास्त विचार न करता त्यावर क्लिक करतं. आमच्याकडे नोंदवलेल्या दोन प्रकरणांमध्ये देखील असाच प्रकार झाला आहे. एक लिंक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करण्यात आली होती, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. आम्हाला संशय आहे की दोन्ही प्रकरणांमध्ये २९ जुलै रोजी एका पोलीस स्टेशनमध्ये आणि दुसऱ्या आणखी एकाचे अकाउंट हॅक झालं होतं. त्या व्यक्तीने ही लिंक ज्या ग्रुप्समध्ये शेअर केली होती त्या ग्रुप्समध्ये हे पोलीस कर्मचारी होते.” दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की ते व्हिडिओ जारी करत आहेत आणि जागरूकता करण्यासाचा प्रयत्न करत आहेत आणि लोकांना ट्रॅफिक चालानसाठी अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका असे आवाहन करत आहेत.