मुंबई : काळ विचित्र असून काहींना पक्षात येण्याआधीच आरक्षण हवे असते. आरक्षण मिळाले तरच मी पक्षात येतो, अशी भूमिका घेतली जाते. पण जरा कुठे ‘खुट्ट’ झाले की आरक्षण मिळाले तरी लोक डबे बदलतात, गाड्या बदलतात, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्यांवर टीका केली.

ठाकरे गटाची अधिकृत संघटना ‘रेल कामगार सेने’चे राष्ट्रीय अधिवेशन दादर येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला उपस्थित कामगार सेनेचे कर्मचारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली. रेल कामगार सेना या एका रुळावरून तुमची वाटचाल सुरू आहे. पण अनेकांना आरक्षण दिले तरी लोक डबे बदलतात, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा तसा स्वभाव नाही. त्यामुळे ज्यांना उद्दिष्टांचे रूळ नाहीत, ते इकडेतिकडे भरकटत आहेत, असा टोला ठाकरेंनी लगावला. आपल्या न्याय-हक्कांसाठी काही आंदोलने करावीच लागतात, आम्ही संयमी आहोत याचा अर्थ आम्ही भेदरट आहोत नाही, असेही ठाकरे म्हणाले.

काेकणातली ट्रेन अन्यत्र वळवल्यास पेटून उठू

दिल्लीकरांनी एक उफराटा निर्णय घेतला आहे. आपली एक ट्रेन गोरखपूरला घेऊन गेले आहेत. गोरखपूरला ट्रेन घेऊन जाण्याबद्दल आमची हरकत नाही, पण आमची हक्काची कोकण ट्रेन जर वळवून तिकडे घेऊन जाणार असाल तर आम्ही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. देशात इतर ठिकाणी असे घडले आहे का, अहमदाबादची ट्रेन वळवून पाटणाला घेऊन नेली आहे का, असा सवाल करतानाच उलट मुंबईतून जाणाऱ्या सूरतच्या गाड्यांचा मार्ग बंद करायला पाहिजे, कारण त्याचा वाईट अनुभव आम्हाला आहे, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी पक्षफुटीवर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदर्शांचा मतांसाठी वापर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मुंबईतील टर्मिनसवर महाराजांचा पुतळा कधी उभारणार, असा सवाल करीत शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारला जाब विचारा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते जर उभारणार नसतील तर तो पुतळा शिवसेना उभारील, असे ठाकरेंनी स्पष्ट केले. सरकारला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ‘ईव्हीएम’ मशीन वाटत आहे. महाराजांचा फक्त जय जय करायचा आणि मते घ्यायची, पण महाराजांचा जयजयकार केल्यानंतरही आपली आदर्श आणि दैवते केवळ मतांसाठी वापरतात, असा टोलाही त्यांनी लगावला.