मुंबई : गिरणी कामगारांचा, गिरण्यांचा इतिहास सत्ताधाऱ्यांना माहीत नाही, त्यांना फक्त मुंबईला लुटणे माहिती आहे. हे सत्ताधारी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडणारे गिरणी कामगार आणि मराठी माणसाला मुंबईबाहेर फेकत आहे. दुसरीकडे धारावीतील अधिकाधिक रहिवाशांना अपात्र ठरवून धारावीकरांनाही धारावीबाहेर फेकण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी अदानीला हातीशी धरून आखला आहे. त्यांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. शिवसेना (ठाकरे) कायम गिरणी कामगारांच्या पाठीशी होती, आहे आणि राहणार. गिरणी कामगारांना वांगणी, शेलू येथे घरे नको, तिथे अदानीचे टॉवर बांधा आणि आमच्या गिरणी कामगारांना धारावीत घरे द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. आझाज मैदानावरील गिरणी कामगारांच्या सभेत ते बोलत होते.
पावणे दोन लाख गिरणी कामगारांपैकी २५ हजार गिरणी कामगारांना मुंबईत घरे देणे शक्य होणार असून दीड लाख गिरणी कामगारांना मुंबईबाहेर घरे दिली जाणार आहेत. राज्य सरकारने त्यासाठी वांगणी आणि शेलू येथे ८१ हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. खासगी विकासकांच्या माध्यमातून ही घरे बांधण्यात येणार असून या घरांसाठी अर्ज, समंती पत्र दाखल करून घेतली जात आहेत. मात्र या घरांना गिरणी कामगार, संघटनांचा विरोध आहे. वांगणीतील विकासक कंपनीवरही कामगारांचा आक्षेप आहे. त्यामुळे वांगणी आणि शेलूतील प्रकल्प रद्द करण्याची मागणी कामगार, वारसांनी केली आहे. मात्र ही मागणी अमान्य करून वांगणी, शेलू येथे प्रकल्प पुढे रेटला जात असल्याने गिरणी कामगार आक्रमक झाले आहेत. या आक्रमक गिरणी कामगारांनी, त्यांच्या वारसांनी बुधवारी आझाद मैदानावर धडक दिली.
गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली १४ संघटनांनी बुधवारच्या मोर्चाची हाक दिली होती. त्यानुसार बुधवारी ११ वाजता राणीची बाग ते आझाद मैदान असा मोर्चा निघणार होता. मात्र या मोर्चाला परवानगी न मिळाल्याने गिरणी कामगार आणि वारसदार बुधवारी सकाळी ११ वाजता थेट आझाद मैदानावर धकडले. नको वांगणी, नको शेलू, मुंबईत हवे हक्काचे घर. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
गिरणी कामगारांच्या आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, बाळा नांदगावकर, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनी उपस्थिती लावून आंदोलनाला पाठिंबा दिला. मुंबईत गिरणी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी यावेळी केली. अदानीसाठी मुलुंडची, कुर्ला मदर डेअरीची, मिठागराची जागा दिली जाते. पण मराठी गिरणी कामगारांना मुंबईबाहेर फेकले जात आहे. धारावीकरांना अपात्र ठरवून धारावीबाहेर फेकले जात आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही. धारावीकरांना धारावीतच घरे द्या, तर गिरणी कामगारांसाठीही धारावीतच घरे द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली