मुंबई : जनसुरक्षा विधेयकाला विधानसभेत महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शविल्याने टीका सुरू होताच विधान परिषदेत शिवसेना (ठाकरे), काँग्रेसच्या आमदारांनी शुक्रवारी आक्षेप घेतला. डाव्या ६४ संघटनांची नावे जाहीर करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. उभय सभागृहाने मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी करून संमती देऊ नये, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपालांकडे करण्यात येणार आहे.
वादग्रस्त जनसुरक्षा विधेयकाला विधानसभेत विरोधकांनी पाठिंबा दर्शविल्याने ते बहुमताने मंजूर झाले होते. त्यावरून विविध नागरी व सामाजिक संघटनांनी टीका सुरू केली. काँग्रेस व ठाकरे गटाने आधी विरोध करण्याचे जाहीर करूनही पाठिंबा दिल्याबद्दल सवाल उपस्थित करण्यात येत होता. विधान परिषदेते हे विधेयक मांडण्यात आले, तेव्हा शिवसेना (ठाकरे) व काँग्रेसच्या आमदारांनी त्याला विरोध केला. कडव्या डाव्या संघटनांप्रमाणेच कडव्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांचाही या कायद्याच्या कक्षेत समावेश करण्याची मागणी शिवसेनेचे अनिल परब यांनी केली.
डाव्या ६४ संघटना कार्यरत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. मग या संघटनांच्या नावांची यादी जाहीर करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. फक्त डाव्याच का, उजव्या संघटनांना का वगळले, असा सवालही ठाकरे यांनी केला. विधिमंडळाच्या उभय सभागृहाने मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी स्वाक्षरी करू नये, अशी विनंती आम्ही राज्यपालांकडे करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची लवकरच भेट घेणार आहेत.
राहुल गांधी यांची नापसंती
विधानसभेत जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नापसंती व्यक्त केल्याचे समजते. यामुळेच विधान परिषदेत अभिजित वंजारी यांनी विरोधी भूमिका मांडली.