लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, मोदी आणि फडणवीसांची सुरक्षा वाढवण्याची उद्धव ठाकरेंची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्यालवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्यालवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांची सुरक्षा आहे त्यापेक्षा जास्त मजबूत करता येईल काय व मुख्यमंत्री फडणवीसांना ‘मोसाद’च्या धर्तीची सुरक्षा व्यवस्था पुरवता येईल काय यावर गांभीर्याने विचार करावाच लागेल असं म्हणताना आम्ही मोदी व फडणवीस यांच्या उदंड निरोगी दीर्घायुष्य चिंतीत आहोत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पुणे पोलिसांनी भीमा–कोरेगावच्या दंगलीमागच्या सूत्रधारांना आता अटक केली व हे सर्व लोक विध्वंसक विचारांचे नक्षलवादी आहेत. हेच लोक मोदी–फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते. हे सगळे रोमांचक तितकेच थरारक आहे. अर्थात या कथानकात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे विरोधकांना टीकेस वाव मिळाला आहे. पंतप्रधानांची सुरक्षा आहे त्यापेक्षा जास्त मजबूत करता येईल काय व मुख्यमंत्री फडणवीसांना ‘मोसाद’च्या धर्तीची सुरक्षा व्यवस्था पुरवता येईल काय यावर गांभीर्याने विचार करावाच लागेल. कारण पुन्हा तेच. लाख मेले तरी चालतील (तसे ते मरतच आहेत), पण लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत. आम्ही मोदी व फडणवीस यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य चिंतीत आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस हे सध्या स्वदेशात नाहीत म्हणजे परदेश दौऱयावर आहेत. त्यांच्या पाठीमागे स्वदेशात मोदी-फडणवीस यांना जीवे मारण्याचा कट उघडकीस आल्याने चर्चेला उधाण आले आहे. हा सर्व कट नक्षलवाद्यांना पाठबळ देणाऱया माओवाद्यांचा आहे, असेही सांगितले गेले. यासंदर्भात पुणे पोलिसांकडून काही धरपकडी झाल्या आहेत. नक्षलवाद्यांच्या कारवायांना भारिप बहुजन महासंघाचे ऍड. प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसमधील काही लोकांची सहानुभूती असल्याचे समोर आले आहे व त्याबद्दल भाजपने चिंता व्यक्त केली आहे. कुणीतरी एका दीडशहाणीने असे म्हटले आहे की, भाजपमधील एका गटालाच मोदी व फडणवीस यांचा काटा काढायचा आहे व त्याच लोकांनी नक्षलवाद्यांना या दोन नेत्यांच्या हत्येची सुपारी दिली आहे. अशा उथळ विधानांना फार महत्त्व मिळू नये असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे.

मुळात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत कोणतेही राजकारण कोणीच करू नये. राष्ट्राचे व राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचे रक्षण व्हायलाच हवे. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे हे आपल्या पूर्वसुरींनी म्हटले आहे ते काही उगीच नाही. त्यामुळे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांभोवती अभेद्य सुरक्षा कवच उभारणीवर जोर द्यावा लागेल अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

राजीव गांधी व इंदिरा गांधी यांच्या हत्येतून आपण धडा घेतला पाहिजे. हिंदुस्थानने दोन थोर नेते अशा हिंसाचारात गमावले आहेत. इंदिरा गांधींना खलिस्तानवाद्यांनी तर राजीव गांधींना ‘लिट्टे’ म्हणजे तामिळी अतिरेक्यांनी मारले. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी मारायचे ठरवले असल्याचे उघड झाले. मात्र या हत्या कटाचा जो उत्सव आपल्या राजकीय मतलबासाठी सुरू आहे तो निषेधार्ह आहे. मुळात पंतप्रधान मोदी यांनी त्यांची सुरक्षा ‘मोसाद’च्या धर्तीवर बनवली आहे. त्यांची सुरक्षा व्यवस्था भेदून आकाशात एखादे पाखरूही फडफड करू शकणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर मंत्रालयालाच सुरक्षेचा किल्ला बनवल्याने तिथे सामान्य जनतेचे येणे-जाणे थांबले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एक कट उघड केला जातो व त्यातून हे थरारक प्रकार बाहेर येतात हे एखाद्या रहस्यमय आणि हॉरर सिनेमाच्या पटकथेप्रमाणे आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

‘१५ राज्यांत भाजपचे सरकार स्थापन करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. हे असेच सुरू राहिले तर संघटनेला खूपच त्रास होईल. त्यामुळे मोदीराज संपुष्टात आणण्यासाठी काहीतरी करावेच लागेल,’ असा एक पत्रव्यवहार पोलिसांनी उघड केला हे जरा गमतीचे वाटते. एका बाजूला चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेले ‘एम-४’ हे शस्त्र्ा खरेदी करण्याचा प्लॅन नक्षलवादी करतात व त्याच वेळेला मोदी-फडणवीस यांना मारण्याचा कट रचणारे एक पत्र पुरावा म्हणून मागे सोडतात हे कारस्थान पटणारे नाही अशी शंका आता तज्ञांनी उपस्थित केली आहे. देशात नक्षलवाद्यांचे हल्ले कुठेना कुठे सुरूच आहेत. त्यात पोलीस व जनता मरत आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पुणे पोलिसांनी भीमा-कोरेगावच्या दंगलीमागच्या सूत्रधारांना आता अटक केली व हे सर्व लोक विध्वंसक विचारांचे नक्षलवादी आहेत. मात्र ज्यावेळी या लोकांनी दंगलीचा भडका उडवला त्यावेळी सरकारने काहीच केले नाही. आता सरकारने दंगलीमागच्या हातांना बेडय़ा ठोकल्या अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येस दिल्लीत हमखास अतिरेकी पकडले जातात व स्वातंत्र्यदिन उधळायचा त्यांचा कट असल्याचे सांगून सुरक्षा व्यवस्था तेवढय़ापुरती ‘टाइट’ केली जाते. मग उरलेले ११ महिने हे अतिरेकी नेमके काय करीत असतात? निवडणुकांच्या तोंडावर राज्यकर्त्यांच्या हत्याकटांचे स्फोट नेहमीच होत असतात, पण महाराष्ट्रात व देशात निवडणुकांना अवकाश आहे. तरीही कट उघड झाला म्हणून आम्हाला चिंता वाटते असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uddhav thackeray demands to toght security of narendra modi and devendra fadanvis