महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी करोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव यांना प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, ‘आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची (प्रमाणपत्राची) गरज नाही’, असं विधान केलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरुंग सकपाळ यांनी अजना स्पर्धा आयोजित केल्याने विरोधकांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर काही दिवसांतच सकपाळ यांनी अजान स्पर्धेशी आपला संबंध नसल्याचा खुलासा केला. त्यानंतर आता एका कॅलेंडरमुळे पुन्हा एकदा भाजपा नेते शिवसेनेवर टीका करताना दिसत आहेत.

भाजपाचे नेते अतुल भातखळकर कायमच आपल्या तिखट शब्दांतील माऱ्यासाठी ओळखले जातात. शिवसेनेवर टीका करण्याची संधी ते कधीही सोडत नाहीत. त्यांनी आज एका कॅलेंडरचा फोटो पोस्ट करत शिवसेनेवर टीका केली आहे. या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर २०२१ असं लिहिलं आहे. कॅलेंडरच्या वरच्या दोन कोपऱ्यांमध्ये शिवसेना आणि युवासेना असंही नमूद करण्यात आलं आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे हे कॅलेंडर मराठी, इंग्रजी याचसोबत उर्दू भाषेतही आहे. कॅलेंडरवर इंग्रजी महिन्यांच्या शेजारी इस्लामिक महिना आणि इतर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. याच कॅलेंडरचा फोटो पोस्ट करत, ‘शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही….’, असा खोचक टोला भातखळखर यांनी लगावला आहे.

आणखी वाचा- पोलीस खात्याच्या कारभारात ठाकरे सरकारच्या हस्ताक्षेपाला कंटाळूनच…; फडणवीसांचा घणाघात

दरम्यान, अजान स्पर्धेबाबत सकपाळ म्हणाले होते, “अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे. त्यामुळे मनःशांती मिळते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल, तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. मुंबादेवी विधानसभेतील ‘फाऊंडेशन फॉर यू’ नावाच्या संस्थेचे पदाधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी अजानची स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित केली होती. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यास मी त्यांना सुचवलं आणि शुभेच्छा दिल्या. पण माझा स्पर्धेशी संबंध नाही.”