मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर, अदानी किंवा मोदींची पदवी यावरून महाविकास आघाडीतील तीन पक्षांची तोंडे तीन दिशांना असल्याच्या पार्श्वभूमीवर  घटक पक्षांमध्ये  समन्वय राखून आगामी निवडणुकांना संयुक्तपणे सामोरे जाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेत भर देण्यात आला. ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची युती झाली असली तरी वंचितला महाविकास आघाडीत प्रवेश देण्याबाबत सहमती होऊ शकली नाही.

गेले काही दिवस महाविकास आघाडीच्या परस्परविरोधी भूमिका पुढे येत असल्याच्या पार्श्वभूमीवर  पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात  पवार यांच्या ‘सिल्वर ओक ’निवासस्थानी मंगळवारी बैठक झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत उपस्थित होते.  राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा सध्या होत आहेत. १६ एप्रिल रोजी नागपुरची सभा आहे. सभांमधून आघाडीची एकसंध भूमिका जनतेपुढे  पुढे जायला हवी. आघाडीत मतभिन्नता निर्माण होणारे वादग्रस्त विषय टाळायला हवेत, यावर चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगरच्या सभेत झालेल्या चुका पुढच्या सभांत होऊ नयेत, यावर चर्चा झाली. सावरकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीसंदर्भात शंका असे वैयक्तिक टिकेचे विषय आघाडीच्या सभांत नकोत, असे बैठकीत ठरल्याचे समजते. राज्यात आणि केंद्रात महाविकास आघाडीची एकी कायम राहावी तसेच संविधानाच्या विरोधात जे आहेत, त्यांच्या विरोधात आघाडी लढेल, असे बैठकीत ठरल्याचे समजते.   वज्रमूठ सभेसंदर्भात चर्चा करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या फटकून राहण्याच्या भूमिकेवर दोघा नेत्यांमध्ये चर्चा झाली. यासंदर्भात काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी शरद पवारांनी बोलावे, असे ठरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसबद्दलही चर्चा सावरकर आणि अदानी या दोन मुद्दय़ांवर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी व शिवसेनेची भूमिका वेगळी आहे. हे मुद्दे सलोख्याने मार्गी लागावेत आणि नाहक आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. काँग्रेस नेत्यांच्या आगळिकीबद्दलही चर्चा झाली.