सत्तेवरील बेगडी हिंदुत्ववाद्यांची महत्त्वाकांक्षा आहे ती हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची, हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात दहशतवादी ठरवून खतम करण्याची. शिकागोतील हिंदू काँग्रेसमध्ये भागवत यांनी या विषयावर भाष्य केले असते तर बरे झाले असते असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. भाजपची काँगेस झाली आहे. काँगेसने मुसलमानांचे तरी लांगूलचालन केले. विद्यमान ‘हिंदुत्ववादी’ राजवटीत हिंदूंचे लांगूलचालन सोडा, त्यांना ‘सेक्युलर’ बनवले जात आहे. काँग्रेसकडून काँगेसकडे असा देशाचा प्रवास सुरू झालाय असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हिंदूंमध्ये वर्चस्व गाजविण्याची कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही, आक्रमकता नाही. एक समाज म्हणून हिंदूंनी एकत्र यायला हवे आणि मानव जातीच्या कल्याणासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मोहन भागवतांनी हिंदू काँग्रेसमध्ये सांगितले. हा हिंदूंवर केलेला आरोप आहे. हिंदूंनी आक्रमक व्हायचे म्हणजे काय करायचे? व आक्रमक झालेल्या हिंदूंना त्यांच्याच राज्यात कायद्याच्या रणगाडय़ाखाली चिरडले जाणार असेल तर त्यावर संघाच्या पोतडीत कोणते चूर्ण आहे? असे सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत.

हिंदूंमध्ये वर्चस्व गाजविण्याची महत्त्वाकांक्षा होती म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले व बाजीराव पेशव्यांनी हिंदुत्वाचा जरीपटका अफगाणिस्तान, पाकिस्तानच्या अटकेपार फडकवला. तात्या टोपे, मंगल पांडेपासून वीर सावरकरांपर्यंत अनेकांनी हिंदू वर्चस्वासाठीच ब्रिटिशांना झुंजवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाचाच पुरस्कार केला व सावरकरांप्रमाणे हिंदूंनी शस्त्रसज्ज व्हावे हा संदेश त्यांनी दिला. हिंदू आक्रमक नसता तर अयोध्येतील बाबरीचा कलंक पुसला गेला नसता व हे सर्व घडविण्यामागे शिवसेनेचेच आक्रमक हिंदुत्व होते. 1992-93 च्या मुंबईतील दंगलीत शिवसेनेचे आक्रमक हिंदुत्व नसते तर काय भयंकर स्थिती येथील समस्त हिंदूंची झाली असती? त्यावेळी हे सर्व जागतिक हिंदू काँगेसवाले कुठे लपले होते? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

शिवसेनाप्रमुखांनी मुंबईत ‘दम’ भरताच वैष्णोदेवी व अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडत गेल्या व अतिरेक्यांच्या हिरव्या लुंग्या पिवळय़ा पडल्या. पण जे हिंदू म्हणून सत्तेवर आले त्यांनी काय केले? हिंदू आक्रमक व एकजूट होता म्हणूनच मोदी हे पंतप्रधान झाले. त्या एकजुटीला, आक्रमकतेला काय फळ मिळाले? शिवसेनेशी युतीचा तुकडा पाडून हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला हे पाहिले व जे जे आक्रमक हिंदुत्वाचा, राष्ट्रहिताचा पुकार करू लागले ते ते भाजपचे दुश्मन ठरू लागले. हिंदुत्वाची शिडी करून सत्तेवर यायचे व काम होताच शिडी फेकायची, हे असले हिंदुत्व सध्या सुरू आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

आता सत्तेवरील बेगडी हिंदुत्ववाद्यांची महत्त्वाकांक्षा आहे ती हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची, हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात दहशतवादी ठरवून खतम करण्याची. शिकागोतील हिंदू काँग्रेसमध्ये भागवत यांनी या विषयावर भाष्य केले असते तर बरे झाले असते. शिकागोत हिंदूंची जी काही जागतिक काँग्रेस भरली ते नेमके कोण होते? त्या काँग्रेसला जे दोन-चार हजार प्रतिनिधी हजर होते त्यांचा आगापीछा काय? शिवसेनेसारखे पक्ष हे लपूनछपून नाही तर उघडपणे हिंदुत्वाचा आक्रमक पुरस्कार करतात. हिंदुत्व हाच आमचा पंचप्राण आहे. तुमच्या जागतिक हिंदू काँग्रेसमध्ये शिवसेनेला स्थान का नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

शिवसेनेसारख्या इतरही लहानमोठय़ा संघटना असू शकतात व आपापल्या मगदुरानुसार ते लोक हिंदुत्वाचे काम करीत असतात. त्यांच्याही प्रतिनिधींना तुमच्या जागतिक हिंदू काँग्रेसमध्ये स्थान द्यायला हरकत नव्हती. तुम्हाला हिंदू एकवटायचा आहे ना, मग ही अस्पृश्यता कशासाठी? हिंदू समाज आज निराश झाला आहे. काँग्रेसने मुसलमानांना वापरले तसे भाजप हिंदूंना वापरत असल्याची भावना बळावत आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.

नेपाळमधील हिंदुत्व संपवले गेले व हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी त्यावर गप्प बसले आहेत. नेपाळ हा चीन आणि पाकिस्तानचा अड्डा बनला आहे. कश्मीरात हिंदू म्हणून आक्रमक होण्याचे राहिले बाजूला, तर हिंदूंविरोधी आणि पाकप्रेमी मेहबुबाच्या प्रेमात हिंदू राष्ट्रवाले पडले व कश्मिरी पंडितांना दगा दिला. हे सर्व घडत असताना सरसंघचालकांकडून आक्रमक प्रतिक्रियेची अपेक्षा होती. हिंदूंना दिलेले एकही वचन भाजप सरकार पूर्ण करू शकलेले नाही. मग ते राम मंदिराचे असेल नाही तर समान नागरी कायद्याचे. हा सर्व आक्रमक हिंदुत्वाचाच अजेंडा होता, पण सत्तेवर येण्याआधीचे आक्रमक हिंदुत्व नंतर आळूच्या फतफत्यासारखे का झाले? यावर ‘जागतिक हिंदू काँग्रेस’मध्ये साधकबाधक चर्चा घडायला हरकत नव्हती असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.