मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नेते व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे अधिकार पक्षाच्या घटनेनुसार होते. त्यांना अधिकार नव्हते असे म्हणणे खोटे ठरेल, अशी साक्ष प्रतोद व आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्यापुढे झालेल्या उलटतपासणीत दिली.ठाकरे यांची नेतानिवड झालेल्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी व्हॉट्सअॅपवर नाही, तर शिवसेना कार्यालय कर्मचाऱ्याने ई-मेलवर पक्षादेश (व्हीप) पाठविला होता, अशी साक्षीत सुधारणाही प्रभू यांनी केली.

शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर अध्यक्षांपुढे सुरू असलेल्या सुनावणीत प्रभू यांची शिंदे गटातर्फे महेश जेठमलानी हे उलटतपासणी घेत आहेत. जेठमलानी यांनी प्रभू यांना शिवसेनेची घटना, ठाकरे यांचे अधिकार, नेतानिवडीची बैठक, शिंदे यांना व्हीप कोणी व कसा बजावला, आदी बाबींवर प्रश्नांची सरबत्ती केली.

हेही वाचा >>>सभापतींची निवडणूक लांबणीवर; ७ ते २० दरम्यान नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बोलाविण्यात आलेल्या बैठकीसाठी आमदारांना व्हीप बजावण्यात आला होता. शिंदे यांच्याशी संपर्क होत नसल्याने मी त्यांना व्हॉट्सअॅपवर तो पाठविला होता, असे प्रभू यांनी आधी साक्षीत सांगितले होते. त्यानंतर त्यात बदल करून कार्यालय कर्मचाऱ्याने ई-मेलवर पाठविल्याचे नमूद केले. ठाकरे यांना शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे अधिकार नाहीत, असा दावा जेठमलानी यांनी केल्यावर ते खोटे असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले.