मुंबई: शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजीपार्क येथील स्मृतिस्थळी एकत्र आले. तब्बल ११ वर्षांनंतर राज ठाकरे यांनी स्मृतिस्थळी उपस्थित राहून बाळासाहेबांना अभिवादन केले. १५ ते २० मिनिटांच्या उपस्थितीत दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अद्याप मनसे व शिवसेना (ठाकरे) यांची युती अधिकृतरीत्या जाहीर झाली नसली तरी राज ठाकरे यांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी उपस्थित राहत बाळासाहेबांना अभिवादन केले. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही दुपारी ११.३०च्या सुमारात स्मृतिस्थळी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ काही मिनिटांतच राज ठाकरे हेही स्मृतिस्थळी दाखल झाले. त्यांनी स्मृतिस्थळी अभिवादन केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संभाषण झाले. अर्धा तासांच्या उपस्थितीदरम्यान राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशीही संवाद साधला. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनीही बाळा नांदगावकर यांच्याशी संवाद साधला. यानिमित्त अनेक वर्षांपासून मनसे-शिवसेना (ठाकरे) यांच्यात निर्माण झालेली कटूता दूर झाल्याचे दिसून आले.
अर्ध्या तासाच्या उपस्थितीनंतर राज ठाकरे परत जाण्यास निघाले तेव्हा आदित्य ठाकरे हेही त्यांच्यासोबत गाडीपर्यंत पोहोचले. यावेळी दोघांमधील कौटुंबिक सलोखा दिसून आला. दरम्यान, शिवसेना (ठाकरे) नेते खासदार प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकीय घडामोडींपासून दूर राहिले असले तरी शिवतीर्थावर उपस्थित राहत त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले.
बाळासाहेबांचा फोटो टि्वट करीत अभिवादन
राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा फोटो एक्स समाजमाध्यमावर पोस्ट करीत त्यांना अभिवादन केले. बाळासाहेबांचा एका सभेसाठीचा फोटो व त्यांच्यासोबत राज ठाकरे असा हा फोटो होता. याआधी मनसे पक्षाने बाळासाहेबांचे छायाचित्र वापरण्यास उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता. मात्र आता दोघांमधील कौटुंबिक सलोखा वाढल्यानंतर राज ठाकरे यांनी एक्सवर बाळासाहेबांचा फोटो ठेवत त्यांना अभिवादन केले.
मुख्यमंत्र्यांकडूनही अभिवादन
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात आणि देशात हिंदुत्वाला आयाम दिला. हिंदुत्व गर्वाने सांगितले पाहिजे अशी त्यांनी लोकांमध्ये अस्मिता निर्माण केली. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या ज्वलंत विचारांवर आम्ही सातत्याने चालत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
