uddhav thackeray reaction in one word on sanjay gawaikwad abuse to sanjay raut spb 94 | Loksatta

संजय गायकवाडांची राऊतांना शिवीगाळ, उद्धव ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…

शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवराळ भाषा वापरली होती.

संजय गायकवाडांची राऊतांना शिवीगाळ, उद्धव ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…
संग्रहित

शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवराळ भाषा वापरली होती. तसेच त्यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यांनी थेट प्रसारमाध्यमांसमोरच राऊतांना शिवीगाळ केल्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. दरम्यान, यासंदर्भात उद्धव ठाकरेंना विचारले असता, त्यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – ‘कर्नाटक भवन’च्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचे शिंदे सरकारवर टीकास्र; म्हणाले, “बेळगावच्या प्रश्नावर मुख्यमंत्री…”

संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. “चित्रपटांमध्ये जसं अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असं कोरलं होतं, तसंच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असं कोरलं आहे, याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल”, असं ते म्हणाले होते. राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. “आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे ‘****’ संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको.” असे ते म्हणाले होते.

हेही वाचा – “शिवरायांच्या अपमानावर गप्प बसणारे राज्यपालांइतकेच दोषी”, उदयनराजेंच्या विधानावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, आज ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना संजय गायकवाडांनी शिवीगाळ केल्याबाबत विचारलं असता, उद्धव ठाकरे यांनी हात जोडून ‘धन्यवाद’ म्हणत एका शब्दात प्रतिक्रिया दिली. पुढे त्यांनी यासंदर्भात बोलणं टाळले.

हेही वाचा – VIDEO: शिंदे गटाच्या आमदाराकडून शिवीगाळ, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि…”

यापूर्वी संजय गायकवाडांनी शिवीगाळ केल्यानंतर संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिले होते. “हे गद्दार आमच्यासारख्या निष्ठावंतांना शिव्या देत असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी रस्त्यावर येऊन शिव्या दिल्या पाहिजेत,” असे ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 16:23 IST
Next Story
मुंबई: म्हाडामध्ये अधिकाऱ्यांमध्ये चक्क झटापट!; एकाचे निलंबन, तर दुसऱ्याच्या बदलीचा प्रस्ताव