scorecardresearch

“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र

“ढिगभर गद्दार सोबत असण्यापेक्षा मूठभर…”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं

“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र
राज ठाकरे उद्धव ठाकरे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

मुंबईतील नेस्को मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि ते आता सगळीकडे फिरत आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं.

“काल-परवा मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आता बाहेर आहे. मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं,” असे राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

हेही वाचा : “आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली”, उद्धव ठाकरेंचा मंगलप्रभात लोढांसह शिंदेंवर हल्लाबोल

याला आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी हळूहळू बाहेर पडतोय. आपलं सरकार असताना दोन वर्षे करोनात गेली. नंतर माझी शस्त्रक्रिया झाल्याने सहा महिने गेले. त्यामुळे मला घराबाहेर पडता येत नव्हते. मी घराबाहेर पडत नसल्याने हा घराबाहेर पडत नाही, अशी टीका करण्यात येत होती. आता घराबाहेर पडलो, तर यांच्या पोटात गोळा यायला लागला आहे,” अशी अप्रत्यक्षपणे टीका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केली आहे. ते मुंबईतील वांद्रे येथील लहुजी वस्ताद साळवी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा : “एक मिनिटात MSMEचा फुलफॉर्म सांगावा, मग…”, नारायण राणेंना राऊतांचे आव्हान

“शिवशक्ती, भिमशक्ती आणि लहुशक्ती ही सर्व एकचा शक्तीची विविधं रुप आहेत. शिवशक्ती, भिमशक्ती आणि लहुशक्ती एकवटली तर त्यात सोबत जे जे येतात ते एकवटले तर प्रचंड मोठी ताकद फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशात उभी राहील. मुंबईत तुमची लोकसंख्या अडीच-तीन लाख असेल. पण, संख्या किती महत्त्वाची, हे निवडणुकीच्या वेळेला ठरतं. एखादा लढा उभा राहतो तेव्हा ढिगभर गद्दार सोबत असण्यापेक्षा मूठभर मर्द सोबत असणं गरजेचं आहे,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आगामी काळात नवीन समीकरण एकत्र येणार असल्याचं संकेत दिले आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 23:26 IST

संबंधित बातम्या