सोपल, दिलीप माने, कलाटे शिवसेनेत
मुंबई : युतीचे सूत्र काय असावे हे आधीच ठरलेले असल्याने त्याप्रमाणेच युती होईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजपच्या अपेक्षेप्रमाणे शिवसेना पडती बाजू घेणार नाही, असेच ठाकरे यांनी सूचित केल्याचे मानले जात आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपप्रमाणेच विरोधी पक्षातील नेत्यांचे शिवसेनेत प्रवेश करण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी राष्ट्रवादीचे बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि भोर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आत्माराम कलाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
विधानसभेला युतीचे काय करायचे ते आधीच ठरले असल्याने त्या सूत्राप्रमाणेच युती होईल. बाकी कोण काय बोलते याविषयावर काहीही बोलण्यात अर्थ नाही. कोणत्याही परिस्थितीत युती करणार काय या प्रश्नावर, चांगलीच परिस्थिती असल्याने युती होईल, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
मानेंच्या प्रवेशामुळे तर्क-वितर्क
२००९ मध्ये काँग्रेसकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून आमदार झालेले दिलीप माने यांचा २०१४ मध्ये भाजपचे नेते व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पराभव केला. आता या मतदारसंघातूनच सुभाष देशमुख पुन्हा निवडणूक लढवणार हे स्पष्ट असताना दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पुढील समीकरणांबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.