अभिषेक तेली

मुंबई : ‘भारतविरोधी, दहशतवाद आणि दहशतवादी कृत्यांना समर्थन करणारी वक्तव्ये करू नयेत. तुमचे सादरीकरण हे कोणत्याही समाजाच्या आणि समूहाच्या भावना दुखावणारे नसावे’, अशा सूचना आयोजक महाविद्यालयांकडून प्राध्यापकांना देण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे दाखले देत या सूचना देण्यात येत असून, देशविरोधी विधाने म्हणजे नेमके काय, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले आहे.

काही दिवसांपूर्वी आयआयटी मुंबई येथे एका प्राध्यापकांच्या व्याख्यानावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आयआयटी प्रशासनाने व्याख्यान किंवा कार्यक्रमांसाठी निमंत्रित पाहुण्यांची पूर्वपिठीका तपासण्यासाठी स्वतंत्र समिती नेमली. व्याख्याने, कार्यक्रम आणि तिथे व्यक्त करण्यात येणारी मते यांबाबत एक नियमावलीच जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता महाविद्यालयांमध्येही व्याख्यानांसाठी बोलावण्यात आलेल्या प्राध्यापकांच्या मतांवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूचनांचा दाखला महाविद्यालये देत आहेत.

हेही वाचा >>>निवडणुकीच्या तोंडावर केंद्राच्या योजनांची देशभर ‘फिरती’ जाहिरात

देशविरोधी मत मांडू नये, दहशतवादी कृत्यांचे समर्थन करणारी वक्तव्ये करू नयेत, कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये करू नयेत, अशा स्वरूपाच्या सूचना महाविद्यालयांकडून पाहुण्यांना देण्यात येत आहेत. मात्र, देशविरोधी मत म्हणजे काय? दहशतवादी कृत्ये म्हणजे कोणती? या मुद्द्यांबाबत स्पष्ट सूचना देण्यात येत नाही.

सांभाळून बोलण्याची अप्रत्यक्ष सूचना’

‘‘भारतविरोधी म्हणजे नक्की काय, याची व्याख्या कोणीच स्पष्ट करीत नाही. एखादी भूमिका पटली नाही तर प्रतिवाद होऊ शकतो, भावना दुखावण्याची भानगड अध्यापनात येते कशी? ’’ असा सवाल प्रा. नीरज हातेकर यांनी केला. भारतविरोधी बोलू नका म्हणजे तुम्ही सांभाळून बोलत जा, असेच अप्रत्यक्षपणे सांगितले जाते. मात्र, महाविद्यालयाकडून आलेल्या सूचनेनंतरही मी व्याख्यान दिले’’, असे प्रा. नीरज हातेकर यांनी सांगितले.

काय घडले?

प्रा. नीरज हातेकर हे रिफ्रेशर कोर्सअंतर्गत मुंबईबाहेरील एका महाविद्यालयात ‘मराठा आरक्षण आणि संबंधित चळवळ’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले होते. भारतविरोधी, दहशतवाद तसेच दहशतवादी कृत्यांना समर्थन करणारी वक्तव्ये करण्यात येऊ नयेत. तुमचे सादरीकरण हे कोणत्याही समाजाच्या व समूहाच्या भावना दुखावणारे नसावे, अशी सूचना प्रा. हातेकर यांना व्याख्यान सुरु होण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयाकडून देण्यात आली. ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमानुसार करण्यात आल्याचे महाविद्यालयाकडून हातेकर यांना सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.