मंत्र्यांच्या वाहनासाठी दिलेल्या प्रवेशपत्रिकेचा वापर करून मंत्रालयाच्या आवारात दाखल झालेली मोटारगाडी तेथील वाहनतळात उभी करण्यात आली होती. तेथे तैनात पोलीस शिपायाच्या दृष्टीस ही मोटारगाडी पडली आणि चौकशीची चक्रे फिरली. अखेर याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “भाजपाचे अनेक महाभाग आज उघडपणे…”; अमृता फडणवीसांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानानंतर संजय राऊतांची टीका

याप्रकरणी तक्रार करणारे पोलीस शिपाई मोहन चव्हाण गेल्या तीन वर्षांपासून मंत्रालयातील सुरक्षा विभागात प्रतिनियुक्तीवर आहेत. शुक्रवारी ते कर्तव्यावर असताना मंत्रालयातील वाहनतळात एक मोटरगाडी उभी असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडली. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी देण्यात येणारी केशरी रंगाची प्रवेशिका या मोटारगाडीच्या पुढील काचेवर चिकटविण्यात आली होती. चौकशी केली असता संबंधित प्रवेशिका दुसऱ्याच वाहनाला वितरीत करण्यात आल्याचे चव्हाण यांच्या लक्षात आले. या मोटारगाडीत चालक प्रथमेश पास्ते बसला होता. चव्हाण यांनी चालकाकडे वाहन आणि प्रवेशिकेबाबत चौकशी केली. त्यावेळी चालकाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे संबंधित प्रवेशिका व मोटारगाडीचालकाला घेऊन ते वरिष्ठांकडे गेले. वरिष्ठांनी चव्हाण यांना याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची सूचना केली. त्यानुसार मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा- राज्यात केवळ १७ लाख, तर मुंबईमध्ये सहा हजार लसींचा साठा उपलब्ध; वर्धक मात्रेसाठी लशींची चणचण

प्राथमिक तपासणीत संबंधित प्रवेशिका इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मंत्र्यांच्या वाहनासाठी जारी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. संबंधित प्रवेशिका आरोपी चालकाने मोटारगाडीला चिकटवून मंत्रालयात प्रवेश केला. तसेच तेथील वाहनतळावर मोटारगाडी उभी केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पास्ते याच्याविरोधात तोतयागिरी केल्याप्रकरणी भादंवि कलम १७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पास्ते याच्यावर सीआरपीसी कलम ४१ (अ) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unidentified vehicle entered into ministry using pass issued for ministerial vehicle mumbai print news dpj
First published on: 25-12-2022 at 10:57 IST