मुंबई : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अटीतटीची स्पर्धा होत असताना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा भरण्यासाठी प्रवेश परीक्षा देईल त्याला प्रवेशपात्र ठरवण्याची वेळ आली आहे. या अभ्यासक्रमाच्या ‘नीट पीजी’चे पात्रता निकष शून्य पर्सेटाइल करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केला. मात्र, हा निर्णय डॉक्टरांच्या गुणवत्तेशी तडजोड करणारा ठरू शकतो, अशी टीका होत आहे.

 देशभरातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची तिसरी प्रवेश फेरी आता सुरू होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहात आहेत. गेल्या वर्षी देशभरात ४ हजार ४०० जागा रिक्त राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) पात्रतेचा निकष शिथिल करण्याची मागणी केली होती. इंडियन मेडिकल असोसिएशननेही  केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांना पत्र पाठवून पात्रता निकष ३० पर्सेटाइल करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही जागा रिक्त राहण्याची शक्यता असल्याने  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पात्रता निकष शून्य पर्सेटाइल केला आहे. त्यामुळे तिसऱ्या प्रवेश फेरीत परीक्षा देणारे सर्वच डॉक्टर पदव्युत्तर प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. 

हेही वाचा >>> रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना आता पाच लाख रुपये; तब्बल ११ वर्षांनी भरपाई रकमेत दहापटीने वाढ

तिसऱ्या फेरीसाठी नोंदणी

समुपदेशनाच्या तिसऱ्या फेरीसाठी नव्याने नोंदणी व पसंतीक्रम भरता येणार आहेत. पात्रता निकषातील बदलांमुळे आतापर्यंत अपात्र ठरलेले डॉक्टर नोंदणी करू शकतील. यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांना पसंतीक्रमांमध्ये बदल करता येईल. तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेश पात्रतेचे निकष शिथिल केल्याने महाविद्यालयातील दरवर्षी रिक्त राहणाऱ्या जागा भरण्यास मदत होईल. मात्र जे विद्यार्थी प्राथमिक पात्रता निकष पूर्ण करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या डॉक्टरांचा दर्जा, गुणवत्ता, अनुभव, क्षमता याबाबत खात्री देता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयामध्ये ‘स्किल लॅब’सारख्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या सुविधा उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे सोयीस्कर ठरेल. 

हेही वाचा >>> गर्भाशयाच्या फायब्रॉईड्समुळे करावा लागतोय वंध्यत्वाचा सामना!

डॉ. अविनाश सुपे, केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुणवत्तेशी तडजोड?

आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयावर वैद्यकीय क्षेत्रातून टीका करण्यात येत आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाचा तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा दर्जा खालावण्याची भीती व्यक्त होत आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गुणवान, सक्षम अशा वैद्यकीय पदवीधरांची म्हणजे डॉक्टरांची निवड व्हावी, यासाठी प्रवेश परीक्षा (नीट) घेण्यात येते. मात्र प्रवेश पात्रतेचा निकष शून्य पर्सेटाइल केल्यामुळे ‘नीट’चा मूळ उद्देशच दुर्लक्षित झाला आहे, असाही आक्षेप घेण्यात येत आहे.